आयपीएल २०२६ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. तर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या निकालावरून अंतिम फेरीत जाणारा दुसरा संघ कोणता हे ठरणार आहे. अंतिम सामन्याआधी बीसीसीआयने खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केला आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान खेळाडू आणि अधिकारी आता स्मार्ट सनग्लासेसचा वापर करू शकणार नाहीत. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने सुचवल्यानंतर हा नियम लागू करण्यात आला आहे. याबाबत सर्व संघांना माहिती देण्यात आली आहे. काही कंपन्यांकडून खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना स्मार्ट सनग्लासेस दिले जात आहेत. या सनग्लासेसचे अनेक फायदे आहेत. या सनग्लासेसचा वापर करून लाईव्ह स्ट्रिमिंग, मेसेज पाठवणं आणि मेसेजचा रिप्लाय करणं खूप सोपं आहे. मोबाईल डेटा आणि वायफाय असल्यामुळे कॉल करणंही शक्य आहे. त्यामुळे सामन्यावेळी असे स्मार्ट सनग्लासेस घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान लाईव्ह सामन्यादरम्यान मोबाईल वापरण्याचा प्रकार घडला होता. राजस्थान रॉयल्स संघाचे मॅनेजर रोमी भिंडर हे डगआऊटमध्ये बसून मोबाईलचा वापर करताना दिसून आले होते. त्यांचा मोबाईल वापरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आयपीएलने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यांच्यावर दंड आकारण्यात आला होता. आता इथून पुढे सामन्यासाठी जाताना मोबाईल फोनसह खेळाडूंचे स्मार्ट सनग्लासेस देखील जमा केले जातील. जर एखादा खेळाडू किंवा अधिकारी नियम मोडताना दिसून आला, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

बीसीसीआयकडून या हंगामात काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. याआधी खेळाडू आपल्या गर्लफ्रेंडसोबत प्रवास करू शकत होते. पण हनी ट्रॅपिंगची भीती पाहता यावर बंदी घालण्यात आली आहे. आता नवे नियम लागू केल्यानंतर खेळाडू आपल्या गर्लफ्रेंडसोबत प्रवास करू शकत नाहीत. जर कुठल्याही खेळाडूने नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.