Smriti Mandhana 103 Fever: वुमन्स प्रीमियर लीग फायनलमध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखाली आरसीबी संघाने दुसरं जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात, संघाच्या यशाची सर्वात मोठी स्टार कर्णधार स्मृती मानधना होती, जिने विक्रमी खेळी केली. ही खेळी जितकी खास होती तितकीच परिस्थितीही महत्त्वाची होती, कारण सामन्यापूर्वी ती खूप आजारी होती. याचा खुलासा विजयानंतर कोचने केला.
गुरुवार, ५ फेब्रुवारीला खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्सने पराभव करून दुसऱ्यांदा वुमन्स प्रीमियर लीगची ट्रॉफी आपल्या नावे केली. या सामन्यात बंगळुरूने २०४ धावांचे मोठे लक्ष्य गाठले, जे WPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग आहे. हे लक्ष्य गाठण्यात बंगळुरूला मदत करण्यात कर्णधार मानधनाने महत्त्वाची भूमिका बजावली. स्मृतीने या सामन्यात ४१ चेंडूत ८६ धावांची वादळी खेळी केली.
कॅप्टन असावी तर स्मृती मानधनासारखी
संघ विजयाच्या अगदी जवळ असतानाच मानधना बाद होत माघारी परतली. आपल्या वादळी खेळीसाठी तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. पण या स्टार फलंदाजाची खेळी सर्वांनी पाहिली. पण या सामन्याच्या आदल्या दिवशी स्मृती मानधनाला १०३ ताप होता. खरंतर, ट्रॉफी जिंकल्यानंतर, जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये संघाच्या विजयाची चर्चा सुरू होती, तेव्हा संघाचे मुख्य प्रशिक्षक मालोलन राजगोपालन यांनी हा मोठा खुलासा केला.
“स्मृती, इतकी कमाल कर्णधार असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कोणतीही तक्रार न करता या सामन्यासाठी आलीस याबद्दलही. काल रात्री तू किती आजारी होतीस हे मला माहिती आहे. तू किती मेहनत घेतलीस हे मला माहीत आहे. ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी, काल संध्याकाळी तिला १०३ ताप होता,” असे आरसीबीचे प्रशिक्षक मालोलन रंगराजन यांनी ड्रेसिंग रूममधील भाषणात सांगितलं.
आरसीबीचे कोच म्हणाले, सामन्याच्या आदल्या दिवशी स्मृतीला खूप ताप आला होता, १०३ ताप होता. पण तिने कोणालाही न सांगता अंतिम फेरीत खेळण्यासाठी फिट होत संघासाठी मैदानात उतरण्यासाठी तिने खूप प्रयत्न केला. हा खुलासा केल्यानंतर, आरसीबीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्टपणे दिसून आलं आणि सर्वांनी पुन्हा एकदा टेबलावर थाप मारत आणि त्यांच्या कर्णधाराच्या धाडसाचं कौतुक केलं.
ही अंतिम फेरी आणि जेतेपद मानधनासाठी खूप खास होतं. तीन महिन्यांपूर्वी, तिने भारताच्या पहिल्या महिला विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण फक्त तीन आठवड्यांनंतर, लग्नादिवशीच तिचं लग्न मोडलं. स्मृती मानधनाने काही दिवसांनंतर पोस्ट करत तिचं लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली. स्मृतीसाठी गेले काही महिने रोलरकॉस्टर राईडप्रमाणे होते. त्यातून सावरत तिने संघासाठी मॅचविनिंग खेळी केली.

