Smriti Mandhana on Raj Shamani Podcast: भारताच्या महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या आयुष्यातील हल्लीचा काळ मोठा संघर्षमय राहिला. वैयक्तिक आयुष्यात स्मृती मानधनाला काही कटू प्रसंगांचा सामना करावा लागला. मात्र तसूभरही फरक तिच्या व्यावसायिक कारकिर्दीवर झाला नाही. २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले. २०२६ सालचे महिला आयपीएलचे जेतेपदही स्मृती मानधना खेळत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाला मिळाले. उत्कृष्ट फलंदाजी आणि नेतृत्वगुण लाभलेली मानधना ही फक्त क्रिकेटच नाही तर सर्वच क्रीडाप्रेमींची चाहती आहे. स्मृती मानधनाने नुकतीच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिला तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र कोणती?, असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर स्मृती मानधना भावुक झालेली पाहायला मिळाली.

वैयक्तिक आयुष्यात वादळ

स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न होणार होते. मात्र काही कारणांमुळे हे लग्न होऊ शकले नाही. ७ डिसेंबर रोजी स्मृती मानधनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लग्न रद्द झाल्याचे जाहीर केले. हा खासगी निर्णय असून आपल्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर केला जावा, अशी विनंती स्मृतीने या पोस्टमध्ये केली होती. त्यानंतर तिने कधीही याबद्दल जाहीर भाष्य केले नाही.

पॉडकास्टमध्ये कोणता प्रश्न विचारला गेला?

प्रसिद्ध यूट्यूबर राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये आजवर अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी, खेळाडू आणि राजकारण्यांनी हजेरी लावलेली आहे. नकळत भावनिक मुद्द्यांना हात घालून समोरच्या व्यक्तीला बोलते करण्याचा प्रयत्न राज शमानीकडून करण्यात येतो. ‘फिगरिंग आऊट विथ राज शमानी’ या मुलाखतीत राजने स्मृती मानधनाची क्रिकेट व्यतिरिक्त इतर दिनचर्या, तिच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या.

“तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र कोणती?”, असा प्रश्न राज शमानीने स्मृती मानधनाला विचारला. या प्रश्नानंतर स्मृती मानधना काही वेळ भावुक झाल्यासारखी दिसली. तिचा आवाज खोल गेला. तिचे डोळे भरून आल्यासारखे दिसले. मात्र पुढच्याच क्षणाला तिने स्वतःला सावरले. “मी फक्त क्रिकेटबद्दल बोलेल”, असे तिने स्पष्ट केले.

थोडा वेळ थांबल्यानंतर स्मृती मानधनाने कठीण रात्रीबद्दल उत्तर दिले. ती म्हणाली, आयसीसी वर्ल्डकप दरम्यानच्या रात्री कठीण गेल्या. यानंतर तिने कोविडचा काळही कठीण होता, असेही म्हटले.

‘भूतकाळातील चुकांमध्ये अडकून राहू नये’

या मुलाखतीत आणखी एका प्रश्नाचे उत्तर देत असताना स्मृती मानधाना म्हणाली, “ज्या लोकांना काहीतरी बदल घडवण्याची जिद्द असते ते भूतकाळातील चुकांमध्ये अडकून राहत नाहीत. तुम्ही जर रडत राहिलात आणि त्या चुका उगाळत राहिलात तर त्यातून तुम्हाला काय मिळणार? याचा अर्थ तुम्ही स्वतःला सुधारत नाहीत, आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करत नाहीत. यासाठी मी कोणत्याही गोष्टीत फार काळ अडकून पडत नाही.”