भारतीय संघाची आघाडीची सलामीवीर स्मृती मन्धानाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत एक खास विक्रम नावावर केला आहे. वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा आज ऑस्ट्रेलियाशी मुकाबला सुरू आहे. या लढतीत स्मृतीने महत्त्वपूर्ण विक्रम नावावर केला. कॅलेंडर वर्षात १००० धावांचा टप्पा ओलांडणारी स्मृती महिला क्रिकेटमधली पहिली बॅट्समन ठरली आहे. हा टप्पा गाठण्यासाठी स्मृतीला १८ धावांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सोफी मोलिनक्सच्या गोलंदाजीवर षटकार खेचत स्मृतीने हा दुर्मीळ विक्रम नावावर केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत स्मृतीने वर्ल्डकपदरम्यान सर्वाधिक धावांचा बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडला होता.स्मृतीचा हा तिसरा वनडे वर्ल्डकप आहे. २०१७ मध्ये भारतीय संघ जेतेपदाच्या अतिशय समीप होता. स्मृती त्या भारतीय संघाचा भाग होती. वनडे क्रिकेटमध्ये स्मृतीच्या नावावर ५००० धावा आहेत. हा विक्रम नावावर असणारी ती केवळ दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे. महिला क्रिकेटमध्ये हा टप्पा केवळ पाचच खेळाडूंनी ओलांडला आहे.

स्मृतीला वर्ल्डकपमधल्या तीन लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. स्मृतीला श्रीलंकेविरुद्ध (८), पाकिस्तान (२३), दक्षिण आफ्रिका (२३) तीन लढतीत मोठी खेळी करता आली नाही. स्मृतीला मोठी खेळी करता न आल्याचा परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीवरही पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.