ICC ODI Rankings Smirti Mandhana World No.1: भारताची उत्कृष्ट महिला फलंदाज स्मृती मानधना पुन्हा एकदा जगातील नंबर वन फलंदाज ठरली आहे. वनडे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मानधनाने आपल्या नावे केले आहेत. गेल्या काही काळातील सातत्यपूर्ण वनडे क्रिकेटमधील कामगिरीची स्मृती मानधनाला परतफेड मिळाली आहे.
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज बनली आहे. मानधना हिने सहा वर्षांनंतर तिचा गमावलेला ताज परत मिळवला आहे. मंगळवारी भारताची उपकर्णधार मानधना २०१९ नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिने ताज्या क्रमवारीत १९ रेटिंग गुण गमावले, ज्यामुळे मानधनाला फायदा झाला आणि ती पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचली. मानधनाचे एकूण ७२७ रेटिंग गुण आहेत. तिच्या पाठोपाठ इंग्लंडची कर्णधार नताली सायव्हर-ब्रंट ७१९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वोल्वार्ड आता ७१९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
स्मृती मानधनानंतर या यादीतील पुढील दोन भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर आहेत, ज्या अनुक्रमे १४ व्या आणि १५ व्या स्थानावर आहेत. या महिन्याच्या अखेरीस भारत आणि इंग्लंडमध्ये पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. अलिकडच्या काळात मानधना एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत सातत्याने टॉप-१० मध्ये राहिली आहे, परंतु २०१९ च्या सुरुवातीपासून स्मृती अव्वल स्थानावर पोहोचू शकलेली नाही.
भारतीय सलामीवीर हल्ली उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि तिने कोलंबोमध्ये येथील श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले. यामुळे तिला रँकिंग सुधारण्यास मदत झाली. टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीतही मानधना चौथ्या क्रमांकावर आहे.
२०१३ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मानधनाने भारतासाठी १०२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात तिने ४६.५९ च्या सरासरीने आणि ८७.७९ च्या स्ट्राईक रेटने ४४७३ धावा केल्या आहेत. तिच्या नावे ११ शतकं आणि ३१ अर्धशतकं आहेत. तिने श्रीलंकेविरूद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी तयारी करत आहेत. याशिवाय यंदा ३० सप्टेंबरपासून महिला वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. त्यामुळे स्मृती मानधनाचा फॉर्म संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.