Smriti Mandhana Breaks Rohit Sharma Record: आशिया चषक २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी खेळ करत श्रीलंकेचा धुव्वा उडवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १८३ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने ७२ धावांनी विजय मिळवून आठव्यांदा या स्पर्धेचा जेतेपदावर नाव कोरलं. यादरम्यान शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने अर्धशतकं झळकावली. या अर्धशतकी खेळीच्या बळावर स्मृती मानधनाने रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

स्मृती मानधनाने या सामन्यात फलंदाजी करताना ३९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ९ चौकार आणि २ षटकार खेचले. यासह भारतीय संघासाठी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. या रेकॉर्डमध्ये तिने भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माला मागे टाकलं आहे. स्मृतीने १७६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४७५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने २ शतकं आणि ३८ अर्धशतकं झळकावली आहेत. तर रोहित शर्माच्या नावे १५९ सामन्यांमध्ये ४२३१ धावा करण्याची नोंद आहे. यादरम्यान त्याने ५ शतकं आणि ३२ अर्धशतकं झळकावली होती.

विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

आता या रेकॉर्डमध्ये रोहित शर्माला मागे टाकल्यानंतर स्मृती मानधनाकडे विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी असणार आहे. भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५० हून अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४१८८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३८ अर्धशतकं झळकावली आहेत. आता स्मृती मानधनाला जर विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडायचा असेल, तर त्याला आणखी २ अर्धशतकांची गरज आहे. हा रेकॉर्ड ती सहज मोडून काढू शकते, कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गजांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली -३९ वेळेस
स्मृती मानधना – ३८ वेळेस
रोहित शर्मा – ३७ वेळेस
सूर्यकुमार यादव – २९ वेळेस
केएल राहुल – २४ वेळेस