Smriti Mandhana Broke World Record in International Cricket: भारताची स्टार फलंदाज व उपकर्णधार स्मृती मानधनाची बॅट श्रीलंकेविरूद्ध चौथ्या सामन्यात तळपली. भारत आणि श्रीलंका महिला संघांंमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये स्मृती मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरली होती. पण यानंतर चौथ्या सामन्यात तिने पुनरागमन करत ८० धावांची वादळी खेळी केली आणि संघाच्या विजयाची स्टार ठरली. या खेळीसह स्मृतीने स्वत:चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत मोठी कामगिरी केली आहे.
मंधानाने दमदार अर्धशतकी खेळी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान मिळवून दिल्याबद्दल तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताने हा सामना ३० धावांनी जिंकला. स्मृतीने या सामन्यात ४८ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्मृती बाद झाली.
८० धावांच्या या खेळीदरम्यान स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला गाठला. पण याशिवाय तिने स्वत:चा विक्रम मोडला. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा मानधनाने स्वतःचाच विक्रम मोडला. २०२५ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १,७०३ धावा केल्या.
एका वर्षात १,७०० पेक्षा जास्त धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. यापूर्वी कोणत्याही इतर महिला खेळाडूने हा पराक्रम केला नव्हता. तिने यापूर्वी २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १,६५९ धावा केल्या होत्या. आता तिने स्वत:चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला फलंदाज
स्मृती मानधना (भारत) – ३२ डाव – १७०३* धावा
स्मृती मानधना (भारत) – ३५ डाव – १६५९ धावा
लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका) – ३७ डाव – १५९३ धावा
लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका) – २६ डाव – १३६४ धावा
नॅट स्किव्हर ब्रंट (इंग्लंड) – ३२ डाव – १३४६ धावा
स्मृती मानधनाने २०२५ मध्ये भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघातही तिने धावांचा पाऊस पाडला. २०२५ मध्ये त्याने २३ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण १३६२ धावा केल्या आहेत, ज्यात पाच शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. २०२५ मध्ये त्याने नऊ टी-२० सामन्यांमध्ये एकूण ३४१ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, तिने या वर्षी एकूण १७०३ धावा केल्या आहेत.
