भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये सर्वबाद झाला, पण तत्पूर्वी संघाने ३३८ धावांचा डोंगर उभारला. तर धावांचा पाठलाग करताना भारताला स्मृती मानधनाच्या रूपात मोठा धक्का बसला.
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर फिबी लिचफिल्डने शतक झळकावत ९३ चेंडूत १७ चौकार व ३ षटकारांसह ११९ धावांची खेळी केली. तर एलिस पेरीने ७७ धावा केल्या, शिवाय बेथ मुनीने २४ धावांचं योगदान दिलं. यानंतर अष्टपैलू अॅश्ले गार्डनरने उत्कृष्ट फलंदाजी केली. गार्डनरने ४५ चेंडूत ४ चौकार, ४ षटकारांसह ६३ धावा केल्या. तर किम गार्थनेही १७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात चांगली केली, पण शफाली वर्मा ५ चेंडूत २ चौकारांसह १० धावा करत बाद झाली. यानंतर स्मृती व जेमिमाने संघाचा डाव सावरला. पण स्मृती मानधना किम गार्थच्या चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाली.
स्मृती मानधना आपल्या कमालीच्या फॉर्मात फलंदाजी करत होती. १०व्या षटकात किम गार्थ गोलंदाजीला आली. किम गार्थचा हा चेंडू लेग साईडवरून जात होता. मानधनाने लेग साईडच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट यष्टीरक्षक एलिसा हिलीच्या ग्लोव्हजमध्ये गेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी झेलबादसाठी जोरदार अपील केलं, परंतु पंचांनी ते नाकारलं आणि वाईड बॉल दिला.
पण यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू पाहिल्यानंतर स्निकोमीटरमध्ये चेंडू बॅटल्याची स्पाईक दिसून आली आणि हिलीनेही चेंडू टिपला. निर्णयाचा आढावा घेतल्यानंतर, मानधनाने वारंवार पंचांना सांगितलं की चेंडू तिच्या बॅटला लागला नव्हता. पण तिसऱ्या पंचांनी तिला बाद दिलं. मानधाना निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली. परत जाताना हरमनलाही स्मृती बॅट लागली नसल्याचं सातत्याने म्हणत होती. तर रिव्ह्यूनंतर पंचांचा निर्णय येण्याआधी स्मृती बॅट लागली नसल्याचं जेमिमाला म्हणत होती.
स्मृती मानधना या सामन्यात २४ चेंडूत २४ धावा करत बाद झाली. यादरम्यान तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १ हजार धावा पूर्ण केल्या आणि ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली. मिताली राजने यापूर्वी भारतासाठी हा पराक्रम केला होता. मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ११२३ धावा केल्या आहेत.
