Smriti Mandhana Half Century At Lords: लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं. प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्नं असतं की त्याने एकदा तरी या मैदानावर खेळावं. या मैदानावर आजवर महिलांचा एकही कसोटी सामना खेळवला गेला नव्हता. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेला एकमेव कसोटी सामना हा ऐतिहासिक आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने दमदार अर्धशतकी खेळी केली. यासह तिने सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
भारतीय महिला संघाचं लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळण्याचं स्वप्नं सत्यात उतरलं आहे. याआधी या मैदानावर महिलांचा एकही आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवला गेला नव्हता. या मैदानावर पुरुषांचा पहिला कसोटी सामना १८८५ मध्ये खेळवला गेला होता. हा सामना होऊन १४२ वर्ष उलटल्यानंतर भारत आणि इंग्लंडच्या महिला संघाला या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात केलेला प्रत्येक विक्रम हा खूप खास असतो.
लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक खेळी
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. भारतासाठी ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती तिसरीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या खास दिवशी तिने अवघ्या ५० चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह ती लॉर्ड्सच्या मैदानावर अर्धशतकी खेळी करणारी जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या सामन्यात भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सलामीला आलेली शफाली वर्मा शून्यावर माघारी परतली. तर यस्तिका भाटीयाने १२ धावांची खेळी कली. त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जने मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि भारतीय संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
इंग्लंड प्लेईंग ११: टॅमी ब्यूमॉन्ट, माया बुशियर, हेदर नाइट, नेट सिव्हर-ब्रंट (कर्णधार), अॅलिस कॅप्सी, एमी जोन्स (यष्टीरक्षक), मॅडी विलियर्स, सोफी एक्लेस्टोन, इसी वोंग, लॉरेन बेल, लॉरेन फाईलर
भारतीय संघ: स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायली सातघरे, श्री चरणी, क्रांती गौड
