Smriti Mandhana Creates History Surpasses Rohit Sharma: आयपीएल २०२६ सुरू असताना भारताचा महिला संघ टी-२० विश्वचषक २०२६साठी सराव करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात स्मृती मानधनाने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. स्मृती मानधनाने इतिहास घडवत रोहित शर्माला मागे टाकत भारतासाठी टी-२० इतिहासात मोठी कामगिरी केली आहे.

डjyनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये पहिला टी-२० सामना खेळवला जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० ला सुरू झाला. दक्षिण आफ्रिका महिला संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. स्मृती मानधनाच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. यानंतर शफाली वर्मा ३४ धाला, जेमिमा रॉड्रीग्ज ३६ धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद ४७ धावांची खेळी करत १५७ धावांचा टप्पा गाठला.

स्मृती मानधनाने इतिहास घडवला!

डरबनच्या किंग्समीड मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या महिला टी-२० सामन्यात स्मृती मानधना भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण करण्यात आल्यानंतर मानधनाने रोहित शर्माचा विक्रम मागे टाकला. यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४,२३१ धावांसह रोहितशी बरोबरी साधल्यानंतर, सून लूसच्या चेंडूवर एक धाव घेत तिने मोठा विक्रम आपल्या नावे केला.

स्मृती मानधना या विक्रमानंतर मोठी खेळी साकारू शकली नाही. स्मृती १४ चेंडूत एका षटकारासह १३ धावा करत आयोबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर बाद झाली. एकूणच, मानधनाच्या नावावर आता १६१ टी-२० सामन्यांत ३०.५३च्या सरासरीने आणि १२४.४५ स्ट्राइक रेटने ४,२४४ धावा आहेत. यात एक शतक आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान, २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत १५९ सामन्यांत ४,२३१ धावा केल्या, ज्यात ५ शतकं आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे.

स्मृती मानधना शफाली वर्मासोबत डावाची सुरुवात करताना सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत दिसली. तिने चेंडू योग्य जागी खेळत धावा काढल्या आणि स्कोअरबोर्ड सतत चालू ठेवला. तिने लॉन्ग-ऑफकडे सुंदर ड्राइव्ह मारत खेळीला सुरुवात केली. डाव पुढे सरकत असताना मानधनाने आपल्या फटक्यांची विविधता वाढवली. क्लोई ट्रायनच्या चेंडूची लेंग्थ अचूक ओळखत तिने मागील स्क्वेअर लेगच्या दिशेने जोरदार षटकार ठोकला. हा फटका तिच्या टायमिंग आणि आत्मविश्वासाचं उत्कृष्ट उदाहरण ठरला.