Smriti Mandhana Fathers Health Updates: भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांचा सांगलीतील विवाह अचानक रद्द करण्यात आला. स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यामुळे स्मृती मानधनाने लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. स्मृतीच्या वडिलांच्या छाती दुखू लागल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटका येण्याची लक्षणं होती. पण यानंतर स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छलदेखील आजारी पडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

स्मृती मानधनाच्या वडिलांना लग्नादिवशी सकाळी छातीत दुखू लागलं आणि त्यानंतर त्यांना रूग्णवाहिकेतून तात्काळ रूग्णालयात नेण्यात आलं. लग्नस्थळी रूग्णवाहिका पोहोचल्याने एकच भितीचं वातावरण पसरलं. अचानक प्रसंग घडल्याने वडिलांच्या उपस्थितीत स्मृतीने लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी श्रीनिवास मानधना यांची तपासणी केल्यानंतर समोर आलं की त्यांना एनजाइना पेक्टोरची लक्षणं दिसली, जी हृदयरोगाशी संबंधित आहेत.

डॉक्टर नमन शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना १.३० वाजता छातीच्या डाव्या बाजूला दुखायला लागलं आणि त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केलं. जिथे त्यांची तपासणी केली, ज्यामध्ये कार्डिओग्राममध्ये ह्रदयविकाराशी संबंधित काही लक्षणं दिसली तर त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असल्याने त्यांना निरीक्षणाखाली ठेवणं महत्त्वाचं होतं. तर गरज पडल्यास एंजिओग्राफी करावी लागू शकते, असंही सांगितलं गेलं.

पलाश मुच्छलला नेमकं काय झालं? का केलं होतं रूग्णालयात दाखल?

स्मृतीच्या वडिलांची प्रकृती थोडी स्थिर झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांना अजून धक्का बसला. एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छलची प्रकृती बिघडल्याने त्याला खाजगी रूग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. वायरल इन्फेक्शन व पित्त वाढल्याची तक्रार केल्याने पलाशवर उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पलाश मुच्छलची प्रकृती फार गंभीर नसल्याने त्याच्यावर उपचार केल्यानंतर रात्री तो पुन्हा हॉटेलवर परतला.

स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांच्या लग्नावर सर्वांच्या नजरा होत्या. शुक्रवारपासूनच त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली होती. शुक्रवारी हळदी समारंभ पार पडला. यानंतर त्याच दिवशी दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा सामना रंगला होती. तर शनिवारी मेहंदी व संध्याकाळी संगीत सोहळा झाला. या सर्व कार्यक्रमांचे व्हीडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या दोघांचा विवाह पुन्हा कधी होणार, नवी तारीख काय असणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.