Smriti Mandhana Harmanpreet Kaur Handshake Avoid Video: भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेविरूद्धची वनडे मालिका ३-०च्या फरकाने एकतर्फी जिंकली. तिसरा वनडे सामना ८ विकेट्स जिंकत भारताने ही मालिका आपल्या नावे केली. झिम्बाब्वेच्या भारत दौऱ्यापूर्वी भारताच्या नेतृत्त्वात मोठे बदल करण्यात आले, हरमनप्रीत कौरची कर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधनाच्या खांद्यावर सोपवली गेली. पण या निर्णयानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा रंगली होती. आता वनडे मालिकेतील एका व्हिडीओने या चर्चांना दुजोरा दिला आहे.

भारतीय महिला संघाला वनडे विश्वचषक जिंकून देणारी कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर झिम्बाब्वे मालिकेपूर्वी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी स्मृती मानधनाच्या खांद्यावर देण्यात आली. हरमनप्रीत कौरला अजूनही संघाचं नेतृत्त्व करण्याची इच्छा होती आणि तिच्या इच्छेविरूद्ध तिला कर्णधारपद सोडावं लागलं, अशी चर्चा सुरू असल्याने स्मृती मानधनाने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर दोघींमध्ये वाद असल्याने संघाचं वातावरण चांगलं नसल्याची चर्चा सुरू आहे.

झिम्बाब्वेविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यानंतर मैदानावर काय घडलं?

झिम्बाब्वेविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु अखेरच्या सामन्यानंतर कर्णधार स्मृती मानधना आणि अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर यांच्याशी संबंधित एक घटना चर्चेचा विषय ठरली. सामन्यानंतर संघातील खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत होते. हरमनप्रीत कौर समोर येताना पाहताच स्मृती मानधना थोडी बाजूला झाली आणि मागे वळून पाहताना दिसली. तितक्यात हरमनप्रीत कौर बाजूने गेली आणि स्मृतीच्या मागे असलेल्या खेळाडूला हस्तांदोलन केलं. तर स्मृतीने पुढे जाऊन दीप्ती शर्माला हस्तांदोलन केलं. दोघींनी स्पष्टपणे एकमेकींना हस्तांदोलन करणं टाळल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सामन्यांदरम्यान दोघी एकमेकींशी फारसं बोलताना दिसल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यातील वादाची चर्चा सुरू होती. पण आता या व्हिडीओमुळे कर्णधारपदातील बदलानंतर स्मृती-हरमनप्रीतसह संघातील वातावरण चांगलं नसल्याचं चित्र समोर येत आहे.

विशेष म्हणजे, मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात माजी कर्णधार हरमनप्रीत कौरने १२१ चेंडूंत १२६ धावा करत उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केलं. या खेळीदरम्यान स्मृती मानधनानेही टाळ्या वाजवून तिच्या शतकाचं कौतुक केलं. पण हँडशेक न केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. संपूर्ण मालिकेचा निकाल भारतीय संघासाठी अत्यंत सकारात्मक राहिला. भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील तिन्ही सामन्यांत विजय मिळवला. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय संघाची कामगिरी प्रभावी होती.