स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज या जोडगोळीच्या अर्धशतकी खेळींच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या टी२० सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.
पहिल्या लढतीत भारतीय संघाने डकवर्थ लुईस पद्धतीने ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी हाराकिली केली. २ षटकात ५ विकेट्स गमावल्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. तिसऱ्या लढतीत मात्र भारतीय संघाने सर्वसमावेशक खेळ करत बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या संघाला काही महिन्यांपूर्वी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आयसीसी स्पर्धेच्या जेतेपदांवर मक्तेदारी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हा पराभव अनपेक्षित होता. या पराभवातून ऑस्ट्रेलियाचा संघ सावरला नसल्याचं चित्र या मालिकेतून दिसलं. या मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला संघाचं नेतृत्व सोफी मोलिनक्सकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. कर्णधारपदासाठी अॅशले गार्डनरचं नाव चर्चेत होतं मात्र सोफीच्या नावाला पसंती मिळाली. मायदेशात झालेल्या पहिल्याच मालिकेत सोफीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका आणि नंतर एकमेव टेस्ट होणार आहे.
२०१७ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला मायदेशात अशा स्वरुपाच्या मालिका पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
अॅडलेड ओव्हल इथे झालेल्या लढतीत भारतीय संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. शफाली वर्मा ७ धावा करून तंबूत परतली. यानंतर स्मृती आणि जेमिमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली. शतकाकडे कूच करणाऱ्या स्मृतीला अनाबेल सदरलँडने बाद केलं. स्मृतीने ८ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ चेंडूत ८२ धावांची खेळी केली.
७ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावांची खेळी करत ऋचा घोष तंबूत परतली. अनाबेलनेच जेमिमालाही बाद केलं. तिने ४ चौकारांसह ४६ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. भारतीय संघाने १७६ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे अनाबेलने २ तर किम गॅरथ, सोफी मोलिनक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
उत्तम फॉर्मात असणारी जॉर्जिआ वॉल १० धावांवर बाद झाली. बेथ मूनीला रेणुकाने तंबूत परतावलं. फोबी लिचफिल्डने प्रतिकार करत २६ धावांची खेळी केली. अनुभवी एलिसा पेरी फक्त १ धावा करू शकली. जॉर्जिआ वारेहम, अनाबेल सदरलँड याही मोठी खेळी करू शकल्या नाहीत. अष्टपैलू अॅशले गार्डनरने मात्र सहकारी बाद होत असतानाही ४५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. गार्डनरला अरुंधती रेड्डीने बाद केलं. गार्डनर बाद होताच ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. भारतातर्फे श्री चरणी आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी तीन विकेट्स पटकावल्या. अरुंधती रेड्डीने २ विकेट्स घेत या दोघींना चांगली साथ दिली.
स्मृतीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं नेहमीच खास असतं. सर्व खेळाडूंनी विजयात योगदान दिलं. जेमिमाबरोबरची भागीदारी चांगली झाली. तिने आल्या आल्या चौकार लगावत माझ्यावरचं दडपण कमी केलं असं स्मृतीने सांगितलं.

