Smriti Mandhana Named As Captain Of Team India: भारतीय संघाला पहिला वनडे वर्ल्डकप जिंकून देणारी कर्णधार हरमनप्रीत कौरने भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता बीसीसीआयने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या जागी स्मृती मानधनाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. इथून पुढे तिन्ही फॉरमॅटमध्ये ती भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
स्मृती मानधनाने याआधीही हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. आता हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडल्यानंतर स्मृती मानधना पूर्णवेळ भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. स्मृतीने आतापर्यंत १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आणि ४ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.
हरमनप्रीत कौर कर्णधार असतानाच स्मृती मानधनाला कर्णधारपदासाठी तयार केलं जात होतं.ती संघाची उपकर्णधार होती. हरमनच्या अनुपस्थितीत स्मृती संघाचं नेतृत्व करायची. त्यामुळे स्मृतीकडे नेतृत्वाचा चांगलाच अनुभव आहे. यासह ती वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्व करते. तिच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २ वेळा वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.
भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर स्मृती मानधना म्हणाली, “भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशासाठी खेळणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं राहिलं आहे. आता संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अतिशय मोलाचे ठरेल. मी बीसीसीआय, निवड समिती, माझे सहकारी खेळाडू आणि या प्रवसात मला साथ देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानते.”
हरमनप्रीत कौरने पोस्ट शेअर करत केली निवृत्तीची घोषणा
हरमनप्रीत कौरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आज मी सर्व फॉरमॅटमधील भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडत आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. या निर्णयाबरोबर अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि आयुष्यभर मनात कोरल्या गेलेल्या असंख्य क्षणांचा समावेश आहे.मी या संघासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी माझ्याकडचं सर्वस्व दिलं आहे. माझं रक्त, घाम, वेळ आणि अनेकदा माझ्या स्वतःच्या खेळाचा तसेच वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचाही त्याग केला आहे. काही प्रसंगी मला माझी वैयक्तिक कामगिरी, स्वतःची प्रगती आणि माझ्या मनात असलेल्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या, कारण माझ्यासाठी संघ नेहमीच सर्वांत आधी होता.”
