Smriti Mandhana Next Captain India Women Cricket Team: भारतीय महिला संघाची कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. अलीकडेच, हरमनच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. आता तिने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कौरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडलं असलं, तरी ती खेळाडू म्हणून खेळणं सुरू ठेवणार आहे. हरमनप्रीत कौरनंतर भारताच्या नेतृत्त्वाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असणार, जाणून घेऊया.
हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला संघाची यशस्वी कर्णधार राहिली आहे. हरमनप्रीत कौर ही भारताच्या महिला संघाची एकमेव कर्णधार आहे, जिने महिला वर्ल्डकप देशाला जिंकून दिला आहे. हरमनप्रीतने भारताचं पाच कसोटी, ५१ वनडे आणि तब्बल १५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. याशिवाय हरमनच्या नेतृत्त्वाखाली भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली हरमनने वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर तिने कर्णधारपदाचा गोड शेवट करत राजीनामा द्यावा अशी चर्चा माजी खेळाडू व सोशल मीडियावर सुरू होती. यानंतर हरमनच्या नेतृत्त्वाखाली भारत टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये गट टप्प्यातून बाहेर पडल्यानंतरही हरमनने नेतृत्त्वाची जबाबदारी सोडावी अशी चर्चा सुरू झाली. पण आता बीसीसीआयसह रिव्ह्यू मीटिंग झाल्यानंतर हरमनने स्वत: हा निर्णय जाहीर केला.
हरमनप्रीत कौरनंतर भारताच्या महिला संघाची कर्णधार कोण?
हरमनप्रीत कौरनंतर आता भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना संघाचं नेतृत्त्व करताना दिसणार आहे. भारताच्या माजी व दिग्गज क्रिकेटपटू डायना इडुलजी यांनीही मागे हरमननंतर आता स्मृती मानधनाला भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी द्यावी असा सल्ला दिला होता. यासह आता हरमनप्रीतनंतर स्मृती मानधना संघाची भावी कर्णधार असणार, अशी चर्चा सुरू आहे.
कर्णधारपदाची धुरा स्मृती मानधनाकडे सोपवावी, अशी मागणी बऱ्याच काळापासून होती. यामागचे एक मुख्य कारण म्हणजे हरमनप्रीत कौरचा खेळाडू म्हणून सध्याचा फॉर्म. ३७ वर्षीय हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली संघ विजय मिळवत असला, तरी तिच्या फलंदाजीची खराब कामगिरी जी संघाच्या विजयांमुळे काहीशी झाकली गेली होती, ती मात्र सर्वांच्याच नजरेत स्पष्टपणे दिसत होती. म्हणूनच तिच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.
BCCIच्या आढावा बैठकीनंतर मिळाले नव्या कॅप्टनचे संकेत
गुवाहाटीमध्ये बीसीसीआयसह झालेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आढावा बैठकीचा मुख्य उद्देश हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाबाबत निर्णय घेणे हाच होता. म्हणूनच, संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याबरोबरच उपकर्णधार स्मृती मानधनाही या बैठकीला उपस्थित होती. सामान्यतः संघाच्या आढावा बैठकीला उपकर्णधार उपस्थित राहत नाही; मात्र, गुवाहाटीमधील स्मृती मानधनाची उपस्थिती हे स्पष्टपणे दर्शवत होती की भारतीय महिला क्रिकेट संघात बदल होण्याची शक्यता आहे.
हरमनप्रीतने २०१६ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली. त्यानंतर, २०२२ मध्ये मिताली राजने निवृत्ती जाहीर केल्यावर ती एकदिवसीय (ODI) संघाचीही कर्णधार बनली. तर स्मृती मानधनानेही भारताची उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. शिवाय वुमन्स प्रीमियर लीगमध्ये तिने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्त्व करत संघाला दोन विजेतेपदं पटकावून दिली आहेत.
