पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावून मायदेशी परतलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडुंची भेट घेतली. यावेळी मोदींनी या सगळ्या खेळाडुंचे अभिनंदन केले. भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधनासाठी हा अनुभव खूपच खास ठरला. विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये स्मृतीने शतक झळकावले होते. कालच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करून स्मृतीच्या शतकी खेळीचे कौतुक केले होते. दुखापत होऊनही मंधनाने विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धची तिची खेळी तर विलक्षण होती, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते. स्मृती मंधना एरवी सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नसते. मात्र, काल खुद्द पंतप्रधानांनी ट्विट केले म्हटल्यावर तिनेही लगेच त्यांना रिप्लाय दिला. तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. तुम्हाला भेटणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. तुम्ही देशासाठी ज्याप्रकारे काम करता ते आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मंधनाने म्हटले. विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमधील कामगिरीने स्मृती मंधनाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मंधनाने ७२ चेंडूत ९० तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात १०६ चेंडूत १०८ धावा झळकावल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर स्मृती मंधना प्रचंड चर्चेत आली होती. सचिनने जागवल्या १९९८च्या शारजातील आठवणी दरम्यान, मायदेशी परतल्यानंतर भारतीय महिला संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाहून बाहेर आल्या आणि त्यांच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या चाहत्यांना पाहून महिला खेळाडू भारावून गेल्या. यापूर्वी महिला क्रिकेटपटूंचे असे स्वागत, असा आदरातिथ्य कधी झाल्याचे कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी या संघातील अनुभवी खेळाडूंनाही आठवत नसावे. या सर्व आदरातिथ्याने महिला क्रिकटपटू भारावल्या होत्याच, त्यामुळेच ‘अच्छे दिन’ आल्याची भावना भारताची कर्णधार मिताली राजने प्रकट केली. २००५मध्येही भारताला उपविजेतेपद मिळाले होते. मात्र त्या वेळी त्या सामन्यांचे प्रक्षेपण झाले नव्हते आणि त्यामुळे फार कमी जणांपर्यंत ही माहिती पोहोचली. यंदा भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या उल्लेखनीय खेळाचा आस्वाद साऱ्या जगाने घेतला आणि त्यामुळेच आपल्या लेकींचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी विमानतळावर चाहत्यांची गर्दी जमली होती. एरव्ही पुरुष क्रिकेटपटूंवर बक्षिसांचा वर्षांव करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) या रणरागिणींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. दर्जेदार खेळाडू घडण्यासाठी भारताने आणखी कसोटी सामने खेळावेत!