Smriti Mandhana reveals playing test match during periods: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधनाने मैदानावर खेळताना महिला खेळाडूंना येणाऱ्या अडचणींवर, विशेषतः मासिक पाळी (Periods) दरम्यान सामना खेळण्याच्या अनुभवावर अत्यंत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. कसोटी सामना खेळत असताना पीरियड्स आल्याचा एक कठीण प्रसंग स्मृती मानधनाने सांगितला. महिला क्रिकेटमध्ये सलग ५ ते ६ तास मैदानावर टिकून राहणं आणि अशा परिस्थितीत शारीरिक व मानसिक समतोल राखणं हे किती आव्हानात्मक असतं, याचा खुलासा त्याने केला. स्मृतीने शेअर केलेला हा प्रामाणिक अनुभव सध्या क्रीडा जगतात प्रचंड चर्चेत असून, महिला खेळाडूंच्या संघर्षाची एक वेगळी बाजू समोर आणणारा ठरला आहे.
स्मृती मानधनाने महिला क्रिकेटपटूंना सामन्यादरम्यान येणाऱ्या एका महत्त्वाच्या पण क्वचितच चर्चिल्या जाणाऱ्या वास्तवाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. कसोटी सामना खेळत असताना स्मृतीला मासिक पाळी सुरू झाली होती. ही परिस्थिती अंपायरशी चर्चा करत स्मृतीने कशी हाताळली आणि त्यामुळे सामना थांबवण्यात आला होता, याबाबत तिने भाष्य केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मैदानात उतरताना अनेक गोष्टी नियंत्रणाबाहेर असतात. हवामान, खेळपट्टीची परिस्थिती, पंचांचा निर्णय आणि महिलांच्या बाबतीत मासिक पाळीचे चक्रही त्यापैकीच एक आहे. स्मृती मानधनाने याच विषयावर खुलेपणाने बोलण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या महत्त्वाच्या चर्चेला नवी दिशा मिळाली.
इन्स्टाग्रामवरील एका मनमोकळ्या व्हिडिओमध्ये मानधानाने कसोटी सामन्यादरम्यान पाळी सुरू झाल्यानंतरचा अनुभव सांगितला. हा व्हिडिओ अत्यंत वैयक्तिक आणि कोणत्याही पूर्वतयारीशिवाय केलेला होता. सार्वजनिक जीवनात सतत चर्चेत असणाऱ्या व्यावसायिक खेळाडूंनी अशा विषयांवर इतक्या मोकळेपणाने बोलणं क्वचितच पाहायला मिळतं.
“मी भारतासाठी खेळते आणि हाच विचार मला सतत प्रेरणा देतो. जेव्हा तुम्ही भारतीय संघाची जर्सी परिधान करता, तेव्हा तुम्हाला दिलेल्या भूमिकेला न्याय द्यावाच लागतो. काही वेळा स्वतःच्या मासिक पाळीतील वेदनांनाही बाजूला ठेवावं लागतं,” असं ती म्हणाली.
“मी पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळत असल्याने…”, स्मृती मानधनाने मासिक पाळीबाबत सांगतिल्यावर पंचांची काय होती प्रतिक्रिया?
स्मृती मानधना प्रसंग सांगताना म्हणाली, “कसोटी सामन्यादरम्यान अचानक माझी पाळी सुरू झाली होती. त्या वेळी मी फलंदाजी करत होते आणि मला तातडीने मैदानाबाहेर जाऊन सॅनिटरी पॅड घालावं लागलं. क्रिकेटच्या मैदानावर मी आजवर केलेली ती कदाचित सर्वात अनोखी गोष्ट होती. मला पंचांकडे जाऊन सांगावं लागलं की, ‘माझी पाळी सुरू झाली आहे आणि मला लगेच मैदानाबाहेर सॅनिटरी पॅड वापरण्यासाठी जावं लागेल.”
“मी पांढऱ्या कपड्यांत खेळत असल्यामुळे पंचांकडे मला परवानगी देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली आणि मी भारतासाठी खेळत होते, त्यामुळे असं नव्हतं की चल आऊट होऊन मैदानाबाहेर जाते. मी माझ्या देशासाठी खेळत होते, मी नॉन स्ट्राईकर एन्डला असलेल्या पार्टरनला सांगितलं, कदाचित मला वाटतंय मला पीरियड्स सुरू झाले आहेत. ती मला लगेच म्हणाली की, तू लगेच जा. त्यामुळे मी मैदानाबाहेर जाऊन येईपर्यंत सामना साधारण १० मिनिटं थांबला होता. याआधी असं कधी घडलं नव्हतं आणि कोणाही बाबतीत असं कधीच घडलं नव्हतं.” स्मृती मानधनाने सांगितलेला हा अनुभव महिला क्रिकेटपटूंना सामन्यादरम्यान येणाऱ्या वेगळ्या आव्हानांची जाणीव करून देणारा ठरला.
