स्मृती मानधना आणि सायली सातघरे यांच्या दमदार खेळाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. लॉरेन बेल आणि सायलीच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची अवस्था एकाक्षणी १०/४ अशी झाली होती. पण शफाली वर्माच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने १६६ धावांची मजल मारली.
बंगळुरूने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. लॉरेन बेल आणि सायली सतघरे या दोघींनी पोषक खेळपट्टीचा फायदा उठवत दिल्लीची दाणादाण उडवली. लिझेल ली, लॉरा वॉल्व्हडार्ट यांना मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जला सायलीने त्रिफळाचीत केलं. अनुभवी मारिझान कॅप भोपळाही फोडू शकली नाही. शफालीने खचून न जाता बंगळुरूच्या गोलंदाजीवर आक्रमण सुरू केलं. निकी प्रसादने तिला साथ दिली. स्नेह राणाने २२ धावा करत डाव सावरला. शफालीने ५ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ चेंडूत ६२ धावांची वेगवान खेळी साकारली. ल्युसी हॅमिल्टनने १९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. लॉरनने २६ धावांत ३ तर सायलीने २७ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स पटकावल्या. प्रेमा रावतने २ विकेट्स घेत या दोघींना चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ग्रेस हॅरिस झटपट बाद झाली. पण स्मृती मन्धाना आणि जॉर्जिआ वॉल यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या स्मृतीला नंदिनी शर्माने बाद केलं. स्मृतीने १३ चौकार आणि ३ षटकारांसह ६१ चेंडूत ९६ धावांची तडाखेबंद खेळी केली. वॉलने ४२ चेंडूत ५४ धावा केल्या.
वूमन्स प्रीमिअर लीगचा ताफा आता नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमहून बडोद्याच्या कोटंबी स्टेडियमवर जाणार आहे.
