Smriti Mandhana Video : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. भारतीय महिला संघाने महिला विश्वचषक २०२५ चे जेतेपद पटकावल्यानंतर स्मृतीने लग्नाचा निर्णय घेतला. स्मृती ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी लग्नबंधनात अडकणार होती. पण स्मृती आणि पलाश यांच्या लग्नात अचानक काही अडचणी आल्या आणि पुढे तिने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे लग्न मोडल्याचे जाहीर केले.
गेल्या काही दिवसात स्मृतीला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले आहे. भारताला महिला विश्वचषक जिंकून देण्यात तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, पण त्यानंतर तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात एका कठीण काळातून जावे लागले आहे. असे असले तरी ती पुन्हा एकदा क्रिकेटचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
दरम्यान येत्या २१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मालिकेसाठी स्मृतीची भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या महिला विश्वचषक फायनलनंतरची भारताची ही पहिलीच मालिका असणार आहे. बुधवारी स्मतीने भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याबरोबर एका कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी स्मृतीने क्रिकेटच्या मैदानावरील तिच्या मानसिक स्थितीबाबत भाष्य केले.
“खरं सांगायचं झालं तर, हरमनने सांगितल्याप्रमाणे, खेळावर असलेले प्रेम… आणि मला वाटत नाही की, मी आयुष्यात कशावरही क्रिकेटपेक्षा जास्त प्रेम करत नाही. त्यामुळे, जेव्हा तुम्ही बॅटिंगसाठी जाता किंवा आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरता, तेव्हा मनात दुसरे कोणतेही विचार असतात असे मला तरी वाटत नाही. जेव्हा तुम्ही भारताची जर्सी घालता, तेव्हा तुम्हाला फक्त भारताचे प्रतिनिधित्व करायचे असते आणि देशासाठी मॅच जिंकायची असते.”
पुढे बोलताना स्मृती म्हणाली की, “आणि हो, मला वाटते की, सर्वात मोठे मोटिव्हेशन हे, जेव्हा तुम्ही जर्सी घालता आणि त्यावर भारत लिहिलेले असते. मी सर्वांना नेहमीच सांगत असते की एकदा का तुम्ही जर्सी घातली की तुम्ही तुमच्या सर्व अडचणी बाजूला ठेवता आणि मैदानात उतरता, कारण तुमच्यावर जबाबदारी असते आणि तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन अब्ज लोकांपैकी एक असता. आणि मला वाटते की, फक्त तो विचारच तुम्हाला पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते करण्यासाठी पुरेसा आहे.”
स्मृतीला यावेळी संघात होणार्या मतभेदांबद्दल विचारले असता स्मृती म्हणाली की, “मला वाटते की, पहिल्यांदा तर मी याकडे एक समस्या म्हणून पाहात नाही कारण देशासाठी गेम जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि देशासाठी आपण गेम कसा जिंकू शकतो याबद्दल प्रत्येकाला त्याचे मत असते,” असे स्मृती म्हणाली.
“पण खरं सांगायचं झालं तर जर आमच्यात त्या चर्चा किंवा वाद झाले नाहीत तर आम्ही मैदानावर जिंकणार नाहीत. कारण जर आपल्यात अशा प्रकारच्या चर्चा होत नसतील जिथे आम्ही एखाद्या गोष्टीवर सहमत नसू, याचा अर्थ आम्ही संघासाठी मॅच जिंकण्याची आमची इच्छा पुरेशी तीव्र नाही. त्यामुळे आमच्यात तशा प्रकारच्या चर्चा नक्कीच होतात,” असेही स्मृती यावेळी म्हणाली.
स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छाल यांचा विवाह २३ नोव्हेंबर रोजी होणार होता. मात्र, स्मृतीचे वडील श्रीनिवास यांच्या तब्येत अचानाक बिघडल्यामुळे हा विवाह सोहळा स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी स्मृती आणि पलाश यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लग्न मोडल्याचे जाहीर केले होते.
