वर्ल्डकपविजेत्या भारतीय महिला संघाने आशियाई उपखंडातही अव्वल असल्याचं सिद्ध करत आशिया चषक स्पर्धच्या जेतेपदावर नाव कोरलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात आणि अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने आठव्यांदा महिला आशिया चषकाच्या जेतेपदाची कमाई केली. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांची तडाखेबंद शतकी भागीदारी या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. भारताने २००४, २००५-०६, २००६, २००८, २०१२, २०१६, २०२२ मध्ये या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.
हरमनप्रीत कौरने फायनलच्या मुकाबल्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दुबईच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी १२९ धावांची तडाखेबंद भागीदारी केली. या भागीदारीने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. शफाली ३९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावा करून बाद झाली. थोड्याच वेळात चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्मृती बाद झाली. तिने ३९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. यानंतर हरमनप्रीत (१४), ऋचा घोष (१७) आणि कमालिनी (१५) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. भारतीय संघाने १८३ धावांची मजल मारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इमेशा दुलानी झटपट बाद झाली. यानंतर चामरी अट्टापटू आणि विश्मी गुणरत्ने यांनी डाव सावरला. दीप्ती शर्माने एका षटकात दोघींना बाद करत श्रीलंकेला अडचणीत टाकलं. ही जोडी फुटल्यानंतर श्रीलंकेने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. श्री चरणीने २० धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेत श्रीलंकेच्या फलंदाजांना स्थिरावू दिलं नाही. दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या.
शफालीने स्पर्धेत २३६ तर स्मृतीने २१३ धावा करत जेतेपदात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संघ आता जपान इथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. त्या स्पर्धेतही भारतीय संघ जेतेपदाचा दावेदार आहे.
भारतीय संघाची जेतेपदापर्यंतची वाटचाल
थायलंड- ९४ धावांनी विजयी
हाँगकाँग- १३७ धावांनी विजयी
पाकिस्तान- ७ विकेट्सनी विजयी
बांगलादेश- ४० धावांनी विजयी
श्रीलंका- ७२ धावांनी विजयी
