Smriti Mandhana Comeback After Wedding Cancelled: स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांचं लग्न गेले काही दिवस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. पण स्मृती मानधनाने पलाशबरोबर होणार लग्न मोडल्याची घोषणा केल्यानंतर या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. स्मृतीने रविवारी ७ डिसेंबरला सकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिचं लग्न मोडलं असल्याची घोषणा केली. यानंतर स्मृतीने आता नवीन सुरूवात केली आहे. स्मृती मानधना यानंतर मैदानावर कधी उतरणार आहे, जाणून घेऊया.
स्मृती मानधनाने लग्न रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर पलाश मुच्छलने नातं संपल्याची घोषणा केली. यानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. स्मृती मानधनाने पलाश मुच्छलबरोबरचे शेअर केलेले सर्व फोटो डिलीट केले. यानंतर पलाशने आज सकाळी स्मृतीला प्रपोज केल्याचा खास व्हीडिओ डिलीट केला. पण त्याने तिच्याबरोबरचे काही फोटो मात्र त्याने अद्याप डिलीट केलेले नाही.
स्मृती मानधनाने लग्न मोडल्याची घोषणा केल्यानंतर नवीन सुरूवात केली आहे. स्मृतीने क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवत सरावाला सुरूवात केली आहे. स्मृती लग्न स्थगित झाल्यापासून गेले काही दिवस सोशल मीडियापासून लांब होती. तिने लग्नासंबंधित सर्व फोटो, व्हीडिओ डिलीट केले होते. जाहिरात किंवा प्रमोशनल व्हीडिओदेखील स्मृतीने शेअर केले नव्हते. शुक्रवारी स्मृतीने कोलगेट जाहिरातीचा एक व्हीडिओ शेअर केला होता. यामध्ये तिच्या हातातील अंगठी गायब असल्याने चर्चांना उधाण आलं होतं.
स्मृती मानधना लग्न मोडल्यानंतर मैदानावर परतली
स्मृतीने रविवारी पोस्ट करत लग्न मोडल्याचं जाहीर केल्यानंतर चर्चांना पूर्णविराम लागला. स्मृती मानधना आता क्रिकेटच्या मैदानावर सरावाला उतरल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. स्मृती मानधना डिसेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेतून मैदानावर पुनरागमन करणार आहे. महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर संघ विश्रांतीवर होता. यानंतर आता श्रीलंकेचा संघ टी-२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

येत्या २१ डिसेंबरपासून भारत आणि श्रीलंका महिला संघांमधील ही टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील तीन सामने विशाखापट्टणम, तर दोन सामने तिरुवअनंतपुरममध्ये खेळवले जाणार आहेत. यानंतर ९ जानेवारीपासून महिला प्रीमियरल लीग २०२६ ला सुरूवात होणार आहे. यामध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ मुंबई इंडियन्सविरूद्ध सलामीचा सामना खेळणार आहे.
