Smriti Mandhana on RCB Title win of WPL 2026: स्मृती मानधनाच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसऱ्यांदा वुमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्सने पराभव करत संघाने जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यात स्मृती मानधनाने मॅचविनिंग खेळी केली. तर जॉर्जिया वॉलसह विक्रमी भागीदारी रचत आरसीबीचा विजय निश्चित केला. दिल्लीने आरसीबीला विजयासाठी २०४ धावांचं विक्रमी लक्ष्य दिलं होतं. जे आरसीबीने २ चेंडू राखून जिंकलं. आरसीबीच्या विजयानंतर कर्णधार स्मृती मानधना काय म्हणाली, जाणून घेऊया.
स्मृती मानधनाने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामन्यात संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेत बाद झाली. स्मृतीने या दरम्यान ४१ चेंडूत १२ चौकार व ३ षटकारांसह ८७ धावांची खेळी केली. तर जॉर्जिया वॉलने ५४ चेंडूत ७९ धावांची खेळी करत स्मृतीला महत्त्वपूर्ण साथ दिली. स्मृती मानधना व जॉर्जिया वॉल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ चेंडूत १६५ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला.
स्मृती मानधनाचं RCBने जेतेपद पटकावल्यानंतर मोठं वक्तव्य
स्मृती मानधना आरसीबीच्या विजयानंतर म्हणाली, “RCB संघाचे चाहते हे जगातील सर्वोत्तम चाहते आहेत, असं मला मनापासून वाटतं. चार वर्षांत दोन विजेतेपदं जिंकणं अविश्वसनीय आहे. मैदान मोठं आहे आणि २०४ धावा हा चांगला स्कोअर आहे, असं आम्हालाही वाटत होतं. मात्र शेवटच्या चार षटकांत आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत सामन्यावर पकड मिळवली.
“लॉरेन बेलचं विशेष कौतुक करावंच लागेल. सामन्यात तिने एकूण ४ षटकं टाकली, पण त्यात फक्त २० धावा दिल्या, माझ्या मते हा सामना जिंकवणारा स्पेल होता. अर्थात, व्हॉलीने आघाडी घेतली. पॉवरप्लेमध्ये तिच्याकडे सर्वाधिक वेळ स्ट्राईक होता. फायनलआधी मी मुलींना सांगितलं होतं की व्हॉली फायनलमध्ये सामना जिंकवणारी खेळी करेल आणि तिनं ते करून दाखवलं,” लॉरेन बेल आणि जॉर्जिया वॉलचं स्मृतीने विशेष कौतुक केलं.
सपोर्ट स्टाफबद्दल बोलताना स्मृती म्हणाली, “सपोर्ट स्टाफचा वाटा खूप मोठा आहे. फोनवरून सातत्याने मार्गदर्शन मिळालं, “आम्हाला हेच अपेक्षित आहे,” असं ते सांगत होते. अन्या, मालो आणि RX सर -आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. मुली प्रचंड मेहनत घेत आहेत; त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. जिममध्ये घेतलेली मेहनत कुठलाही स्कोअर पाठलाग करण्याचा आत्मविश्वास देते. पण आज व्हॉलीने जे केलं, ते खरंच खास होतं. आज प्रत्येक जण घरी परतताना हेच म्हणेल, या यशात आमचा वाटा आहे.”
“आरसीबीच्या सर्व चाहत्यांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत. हा विजय तुमचाच आहे आणि मी २०२४ मध्येही सांगितलेलं, आता परत सांगते ई साला कप नाम्दु-२,” असं स्मृती मानधना अखेरीस म्हणाली.

