Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Called Off: भारतीय महिला संघांची उपकर्णधार स्मृती मानधना व सिने संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत गेले काही दिवस सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत. २३ नोव्हेंबर २०२५ ला होणारा दोघांचा लग्नसोहळा अचानक स्थगित करण्यात आला आणि त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलबाबत विविध माहिती समोर येऊ लागली. त्यानंतर आता स्मृतीने स्वत: लग्न मोडल्याचं जाहीर केलं आहे.

स्मृतीच्या लग्नादिवशी तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यामुळे या दोघांचा लग्नसोहळा स्थगित करण्यात आला होता. यानंतर पलाश मुच्छलची देखील प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल केलं व दुसऱ्या दिवशी तो मुंबईला परतला. पलाश मुंबईला परतल्यानंतर चर्चांना उधाण आलं. त्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या. यादरम्यान स्मृती व पलाश यांचा लग्नसोहळा स्थगित झाल्यानंतर स्मृतीने तिच्या इन्स्टाग्रामवरून लग्नासंबंधित फोटो, व्हीडिओ डिलीट केले होते. स्मृतीने टीम इंडियामधील तिच्या खास मैत्रिणींबरोबर साखरपुडा झाल्याची घोषणा करत एक खास व्हीडिओ शेअर केला होता, तो व्हीडिओही स्मृतीने डिलीट केला.

स्मृती मानधना या संपूर्ण प्रकरणानंतर सोशल मीडियापासून दूर होती. दोन दिवसांपूर्वी तिने एक जाहिरात व्हीडिओ शेअर केला होता. यामध्ये तिच्या हातात लग्नाची अंगठी नसल्याने पुन्हा चर्चांना सुरूवात झाली. शिवाय तिचा आवाज आणि चेहरा पाहून सर्वच जण तिची काळजी करत होते. यानंतर आता रविवारी सकाळी स्मृतीने पोस्ट शेअर करत लग्न रद्द झाल्याची मोठी अपडेट चाहत्यांबरोबर शेअर केली.

स्मृतीन मानधनाने आज ७ डिसेंबर २०२५ ला तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लग्न मोडल्याची माहिती दिली. स्मृतीने या पोस्टमध्ये लिहिलं, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं की यावेळी मी याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. मी एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि मी ते असंच ठेवू इच्छिते, परंतु मला हे स्पष्ट करायचं आहे की माझं लग्न रद्द करण्यात आलं आहे.”

स्मृती मानधना पुढे म्हणाली, “मला हे संपूर्ण प्रकरण इथेच संपवायचं आहे आणि तुम्हा सर्वांनाही तसेच करण्याची विनंती करते. मी तुम्हाला विनंती करते की कृपया यावेळी दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्या. आपल्या सर्वांसमोर काही ना काही उद्दिष्ट असतं आणि माझ्यासाठी हे उद्दिष्ट्य म्हणजे देशाचं सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणं. भारतासाठी खेळत राहणं आणि शक्य तितकी विजेतेपदे जिंकणं, हेच माझं ध्येय आहे आणि आयुष्यभर तेच माझं उद्दिष्ट असेल. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. पुढे जाण्याची वेळ आली आहे.”

Smriti Mandhana Wedding Called Off Instagram Story
स्मृती मानधनाची लग्न रद्द झाल्याची पोस्ट

स्मृती मानधनाने शेअर केलेल्या या पोस्टमुळे स्मृती-पलाशचं लग्न कधी होणार, या चर्चांना मात्र पूर्णविराम लागला आहे. स्मृतीची ही पोस्ट अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल झाली आहे. स्मृती आता डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरूद्ध मायदेशात होणाऱ्या टी-20 मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.