‘आयसीसी’च्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर मोहोर; पुरुषांत शाहीनची बाजी

दुबई : भारताची तडाखेबाज सलामीवीर स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. डावखुऱ्या स्मृतीने २०२१ वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत दिमाखदार कामगिरी करताना कारकीर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे केला.

Tom Latham believes that Test cricket is the most important sport news
कसोटी क्रिकेटच सर्वांत महत्त्वाचे टॉम लॅथम
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद
kangana ranaut career movies
१६ व्या वर्षी घर सोडणारी ‘धाकड’ कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ झाली, पण…

वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा ‘रेचल हेहो फ्लिंट’ करंडक पटकावताना २५ वर्षीय स्मृतीने इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट, दक्षिण आफ्रिकेची लिझेल ली आणि आर्यलडची गॅबी लेविस यांच्यावर सरशी साधली. स्मृतीने याआधी २०१८ मध्येही हा पुरस्कार मिळवला होता. ‘आयसीसी’चा वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दोन वेळा जिंकणारी ती एलिस पेरीनंतर विश्वातील केवळ दुसरीच खेळाडू ठरली आहे.

भारतीय महिला संघाला २०२१ वर्षांत फारसे यश प्राप्त करता आले नसले, तरी सांगलीच्या स्मृतीने सातत्यपूर्ण कामगिरी करताना आपली छाप पाडली. घरच्या मैदानांवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताला आठपैकी केवळ दोन सामने जिंकता आले. स्मृतीने या दोन्ही विजयांत महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिने नाबाद ८० धावांची खेळी केली. त्यानंतर ट्वेन्टी-२० मालिकेच्या अखेरच्या लढतीत तिने नाबाद ४८ धावा साकारताना भारताला विजय मिळवून दिला.

इंग्लंडमध्ये एकमेव कसोटीच्या पहिल्या डावात स्मृतीने ७८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच एकदिवसीय मालिकेतील एकमेव विजयात ४९ धावांचे योगदान दिले. मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रकाशझोतातील कसोटीत तिने (१२७) शतक झळकावताना सामनावीराचा पुरस्कार मिळवला. ऑस्ट्रेलियात कसोटी शतक साकारणारी स्मृती पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. स्मृतीने २०२१ वर्षांत एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३८.८६च्या सरासरीने ८५५ धावा केल्या, यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता.

वर्षांतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पटकावला. त्याने इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्यावर मात केली. शाहीनने २०२१ वर्षांत ३६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ७८ मोहरे टिपले.

आयसीसीने माझ्या कामगिरीची दखल घेतली, याचा खूप आनंद आहे. या पुरस्कारामुळे खेळात सुधारणा करत राहण्याची आणि भारतीय महिला संघाच्या यशात योगदान देत राहण्याची मला स्फूर्ती मिळेल. आता २०२२ मध्ये  न्यूझीलंड येथे होणारा एकदिवसीय विश्वचषक जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आम्ही तयारीला सुरुवात केली आहे.

स्मृती मानधना

आयसीसीपुरस्कार विजेत्यांची यादी

* वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू (महिला) : स्मृती मानधना

* वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू (पुरुष) : शाहीन शाह आफ्रिदी

* वर्षांतील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू (पुरुष) : जो रूट

* वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू (महिला) : लिझेल ली

* वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू (पुरुष) : बाबर आझम * वर्षांतील सर्वोत्तम पंच : मरे इरॅस्मस