Smriti Mandhana World Record in Cricket History: टीम इंडियाची क्वीन स्मृती मानधनाने टी-२० क्रिकेट इतिहासात आपलं नाव सुवर्णअक्षरांनी नोंदवलं आहे. स्मृतीने नेदरलँड्सविरूद्ध टी-२० विश्वचषरक २०२६ मधील सामन्यात एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात मानधनाने अवघ्या ४७ चेंडूंमध्ये ७४ धावांची शानदार खेळी साकारली. तिच्या डावात ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. आक्रमक फलंदाजी करत तिने नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. यादरम्यान तिने असा विक्रम केला आहे की आजवर पुरूष व महिला क्रिकेटमध्ये तो कोणालाच जमला नाही.

भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं. स्मृती मानधना व शफाली वर्माच्या जोडीने कमालीची सुरूवात करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान स्मृतीने ६०० चौकारांचा टप्पा पूर्ण केला. या ऐतिहासिक विक्रमासह स्मृती मानधनाने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमधील आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे.

महाराष्ट्राची ३० वर्षीय डावखुरी फलंदाज सलामीवीर स्मृती मानधना ही पुरुष आणि महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ६०० चौकारांचा टप्पा गाठणारी जगातील पहिली खेळाडू ठरली. स्मृती मानधनाने नेदरलँड्सविरूद्ध ७४ धावांच्या खेळीमध्ये लगावलेल्या या ११ चौकारांमुळे महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण चौकारांची संख्या ६०४ वर पोहोचली आहे.

महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती सुझी बेट्स आणि चमारी अट्टापट्टू यांच्याही पुढे, अव्वल स्थानावर विराजमान आहे. बेट्सने १८३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील १७६ डावांत ५२१ चौकार मारले आहेत, तर अट्टापट्टूने १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४९३ चौकार लगावले आहेत. तर पहिल्या स्थानी असलेल्या स्मृतीने १६८ सामन्यांमध्ये ६०४ चौकार लगावले आहेत.

पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर आहे. पाकिस्तानच्या बाबरने १४५ टी-२० सामन्यांच्या १३६ डावांमध्ये ४७७ चौकार मारले आहेत. त्याच्यापाठोपाठ पॉल स्टर्लिंगचा क्रमांक लागतो, ज्याने १६३ टी-२० सामन्यांत ४४९ चौकार मारले आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज (पुरूष-महिला दोन्ही)

स्मृती मानधना – ६०४ चौकार
सुझी बेट्स – ५२१ चौकार
चमारी अट्टापट्टू – ४९३ चौकार
बाबर आझम – ४७७ चौकार
बेथ मुनी – ४५९ चौकार
पॉल स्टर्लिंग – ४४९ चौकार