Smriti Mandhana Lords Record in INDW vs ENGW test: भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधनाने क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लंडनच्या ऐतिहासिक ‘लॉर्ड्स’ मैदानावर एक नवा इतिहास लिहिला आहे. लॉर्ड्सच्या आव्हानात्मक आणि वेगवान खेळपट्ट्यांवर जगातील भल्याभल्या फलंदाजांचा कस लागतो, त्याच मैदानावर स्मृतीने आपल्या उत्कृष्ट तंत्राचा आणि संयमाचा परिचय देत दोन्ही डावांत शानदार अर्धशतकी खेळी साकारल्या आणि जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा डंका वाजवला. आता दुसऱ्या डावात स्मृती शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर गेल्या १४२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळवला जात आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील या सामन्यात भारताचा संघ सध्या सामन्यात एक पाऊल पुढे आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटपर्यंत भारत २६९ धावांनी आघाडीवर आहे. पहिल्या डावात टीम इंडियाने २८५ धावांची खेळी केली आणि प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला १७० धावांवर सर्वबाद केलं. यानंतर दुसऱ्या डावात स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली.
स्मृती मानधनाने लॉर्ड्सवर इतिहास घडवला
स्मृती मानधनाने पहिल्या डावात ५१ धावा, तर दुसऱ्या डावात ५३ धावांची खेळी करत लॉर्ड्सवर कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारी इतिहासातील पहिली महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. पहिल्या डावात स्मृती मानधना ८३ धावांवर बाद झाल्याने तिचं शतक हुकलं. तर आता दुसऱ्या डावात स्मृती ६९ धावा करत मैदानात कायम आहे. स्मृतीने १२४ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ही खेळी केली आहे.
स्मृती मानधनाचा हा विक्रम केवळ तिच्या वैयक्तिक कारकिर्दीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय महिला क्रिकेटसाठी एक अत्यंत अभिमानास्पद सुवर्णक्षण ठरला आहे. स्मृतीने या ऐतिहासिक कामगिरीसह आपलं नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचं अजरामर केलं आहे. तिच्या या अद्वितीय खेळीमुळे भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.
सध्या दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजी करत असून सफाली वर्मा ३३ धावांवर बाद झाली. शफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. यानंतर मैदानावर आलेल्या यस्तिका भाटियाने स्मृतीला चांगली साथ दिली. या दोघींनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६६ धावांची भागीदारी रचली. यस्तिका भाटिया ३९ धावांवर तर स्मृती ६९ धावांवर खेळत आहे. यासह दुसऱ्या डावात टीम इंडियाने १५४ धावा करत २६९ धावांची आघाडी घेतली आहे.
