Smriti Mandhana World Record Womens T20I Cricket Asian Games: भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधनाने महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि बांगलादेश महिला संघांमध्ये उपांत्य सामना खेळवला जात आहे. या सामन्यात स्मृती मानधनाने फलंदाजी करताना या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी कोणालाच आजवर करता आली नव्हती.

भारताने बांगलादेशविरूद्ध सेमीफायनल सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधना व शफाली वर्माच्या जोडीने दणक्यात सुरूवात केली आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पहिल्या विकेटसाठी दोघींनी ३६ चेंडूत ७२ धावांची भागीदारी साकारली. यादरम्यान स्मृतीने १४ धावा करताच सुझी बेट्सचा विक्रम मागे टाकला. स्मृती मानधनाने सुझी बेट्सला मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

स्मृती मानधना आता महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी पहिली फलंदाज ठरली आहे. तिने सुझी बेट्सला मागे टाकत हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. सुझी व स्मृतीनंतर या यादीमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे. हरमनने ४२७८ धावा केल्या आहेत. तर यानंतर श्रीलंकेची कर्णधार चमारी अथापथू व पाचव्या स्थानी न्यूझीलंडची माजी खेळाडू सोफी डिव्हाईन आहे.

स्मृती मानधनाने या सामन्यात १९ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांच्या खेळीसह दणदणीत ३७ धावांची खेळी साकारली. या खेळीसह स्मृतीने महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये ४७८८ धावा केल्या आहेत. याशिवाय महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारी ती भारताची पहिली फलंदाज ठरली आहे. तिच्यानंतर शफाली वर्माने देखील टी-२० मध्ये झटपट १०० षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज

स्मृती मानधना (भारत) – १७८ सामने – ४७८८ धावा
सुझी बेट्स (न्यूझीलंड) – १८६ सामने – ४७५८ धावा
हरमनप्रीत कौर (भारत) – १८७ सामने – ४२८७ धावा
चमारी अथापथू (श्रीलंका) – १७२ सामने – ४२८२ धावा
सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड) – १५८ सामने – ३८१७ धावा