वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या चक्रातील पहिला कसोटी सामना बांगलादेश वि. श्रीलंका या संघांमध्ये खेळवला गेला. हा पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. बांगलादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आला असून दोन्ही संघ तिथे २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील गॅले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला. दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना रंगला होता. पण या सामन्यात मात्र सर्पमित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
या सामन्याची खरी चर्चा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका चाहत्यामुळे झाली, जिथे एक सर्पमित्र त्याच्या साप आणि माकडासह सामना पाहताना दिसला. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. या सर्पमित्र असलेल्या चाहत्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
सामन्यादरम्यान, गॅले स्टेडियममध्ये एक सर्पमित्र त्याच्या पारंपारिक शैलीत दिसला. त्याने सापांची टोपली आणि लाल कापडात गुंडाळलेले माकड आणले होते. तो बासरी वाजवून सापांना नियंत्रित करताना श्रीलंका आणि बांगलादेशमधील सामना पाहत पाहत होता. दरम्यान एक साप त्याने आपल्या हातात धरला होता.
हे दृश्य चाहत्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनलेच, शिवाय सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. ही घटना समोर येईपर्यंत सामन्याचा निकाल जवळजवळ निश्चित झाला होता. श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी खूप प्रयत्न केले, पण सामना अनिर्णित राहिला. तरीही, सर्पमित्राची ही अनोखी शैली क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधणारी ठरली.
१७ ते २१ जून २०२५ दरम्यान गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी बांगलादेशची सुरुवात खराब झाली, त्यांनी सुरुवातीलाच तीन विकेट गमावल्या आणि धावसंख्या ४५/३ पर्यंत पोहोचली. पण नझमुल हुसेन शांतोने १४८ धावा आणि मुशफिकुर रहीम १६३ धावा यांनी आपल्या शतकांच्या जोरावर आणि उत्कृष्ट भागीदारीमुळे संघाचा डाव सावरला. यानंतर लिटन दासने ९० धावांची खेळी खेळली आणि बांगलादेशला ४९५ धावांपर्यंत पोहोचवले.
दुसरीकडे, श्रीलंकेच्या पहिल्या डावात, पथुम निस्सांकाने १८७ धावा आणि कामिंदू मेंडिसने ८७ धावा करत संघाला ४८५ धावांपर्यंत पोहोचवले, जी धावसंख्या बांगलादेशपेक्षा फक्त १० धावांनी कमी होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी, बांगलादेशने दुसऱ्या डावात १७७/३ अशा धावसंख्येसह १८७ धावांची आघाडी घेतली.
या कसोटीत चौथ्या दिवशी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला, परंतु बांगलादेशने त्यांची आघाडी २८५/६ पर्यंत वाढवली. शेवटच्या दिवशी, श्रीलंकेला २९६ धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यांनी ४ विकेट गमावून ७२ धावा केल्या, ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला.