न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. टीम इंडियाला मालिकेत परतण्याची संधी आहे, अजून दोन सामने बाकी आहेत आणि दोन्ही जिंकून टीम इंडिया मालिकाही जिंकू शकते. भारतीय संघाच्या नजरा आयसीसी ट्रॉफीवर खिळल्या आहेत. अशात पाकिस्तान्या माजी क्रिकेपटूने कामरान अकमलने टीम इंडियाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
टीम इंडिया द्विपक्षीय मालिका जिंकते, पण आयसीसी ट्रॉफीमध्ये पराभूत होते, असा प्रश्न अनेकवेळा उपस्थित झाला आहे. तसंच टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी योग्य म्हटलं जात नाही, यावर पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमलने प्रश्न उपस्थित केला आहे.
कामरान अकमल एका कार्यक्रमात म्हणाला की, ”लोक बोलत आहेत की भारताने १० वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही. तुम्ही प्रत्येक स्पर्धा जिंकू शकत नाही. आयसीसी ट्रॉफी जिंकणे हाच एकमेव निकष असेल, तर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांवर बंदी घालायला हवी.”
न्यूझीलंडच्या नावावर फक्त दोन आयसीसी विजेतेपद आहेत. त्यांनी २००० मध्ये स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वाखाली आयसीसी नॉकआउट ट्रॉफी जिंकली. त्यानंतर जून २०२१ मध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली WTC फायनल जिंकली. हे दोन्ही विजय भारताविरुद्ध मिळवले आहेत. टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ साली जिंकली होती, जेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर वनडे विश्वचषक असो की टी-२० विश्वचषक, प्रत्येक वेळी टीम इंडियाचा पराभव झाला आहे.
हेही वाचा – वसीम अक्रमने रमीझ राजावर साधला निशाणा; म्हणाला, ‘तो फक्त सहा दिवसांसाठी…’
भारताला आता एकदिवसीय विश्वचषक मायदेशात खेळायचा आहे, जिथे टीम इंडियाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यजमानपद भूषवायचे आहे. येथे संघाला आयसीसी ट्रॉफीचा दशकभराचा दुष्काळ संपवण्याची संधी असेल. सध्या टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे.