काही लोकांना धोनीचं यश खुपतं आहे : रवी शास्त्री

योग्य निर्णय घेण्यास तो सक्षम

ms dhoni, international career, ravi shastri,marathi news, marathi, Marathi news paper
धोनी सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. धोनी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. पण काही लोकांना त्याचे यश पाहवत नाही, असे ते म्हणाले. एका बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री म्हणाले की, काही लोकांना धोनीचं यश पाहवलं जात नाही. त्याने खराब खेळावे आणि त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द धोक्यात यावी, अशी त्यांची इच्छा असून ही मंडळी धोनीची कारकिर्द संपुष्टात कधी येते याची वाट पाहत आहेत, असा टोमणा त्यांनी धोनीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना लगावला. धोनी एक चांगला खेळाडू आहे, त्याचा निर्णय घेण्यास तो सक्षम आहे. योग्यवेळी तो योग्य निर्णय घेईल असेही शास्त्री म्हणाले.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर धोनीने या प्रकारातून निवृत्ती घ्यावी, या चर्चेला उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर शास्त्रींना धोनीला टी-२० सामन्यातून वगळण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शास्त्री म्हणाले की, धोनी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू असून, त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. त्याने एक विशेष उंची गाठली आहे. त्यामुळे तो प्रसारमाध्यमांसाठी एक विषय आहे. मोठ्या खेळाडूंच्याबाबतीत असे होतच असते. त्यामुळे त्याच्यावर होणाऱ्या टीकेमुळे काही फरक पडणार नाही.

भारतीय संघासोबत तो असणे किती महत्त्वपूर्ण आहे, हे आम्ही जाणतो, असे सांगत शास्त्रींनी धोनीच्या टी-२० क्रिकेट कारकिर्दीवर निर्माण झालेल्या प्रश्नाला पूर्ण विराम दिला. एका वर्षातील धोनीच्या कामगिरीकडेही त्यांनी लक्ष वेधले. मागील एका वर्षात धोनीनं ६५ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयात धोनीचे योगदान महत्त्वपूर्ण होते असेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Some jealous people waiting to see end of ms dhonis international career says ravi shastri