Sonal Dinusha Breaks Joe Root Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेती पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. तर मालिकेतील दुसरा सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे ही मालिका भारतीय संघाने १-० ने आपल्या नावावर केली. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये सोनल दिनुशा हे नाव तुफान चर्चेत राहिलं. २ कसोटी सामन्यातील ४ डावात फलंदाजी करताना ३ शतकांसह त्याने ४२० धावा केल्या. दरम्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २ शतकं झलकावून त्याने श्रीलंकेला पराभवापासून वाचवलं. यादरम्यान त्याने जो रूटचा एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला.

या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलंबोत पार पडला. या सामन्यात फलंदाजी करताना २५ वर्षांच्या सोनल दिनुशा याने दोन्ही डावात शतकं झळकावली. श्रीलंकेचा पराभव जवळजवळ निश्चित होता, पण नेमकं त्याचवेळी दिनुशा शेवटपर्यंत टिकून राहिला आणि त्याने श्रीलंकेला पराभवापासून वाचवलं. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने १०३ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने नाबाद १३३ धावांची खेळी केली.

स्वीप शॉट मारुन सर्वाधिक धावा

या मालिकेत दिनुशाने फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. समोर येणारे चेंडू त्याने डिफेन्स केले. पण जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्याने स्वीप शॉट मारुन चौकार वसूल केले. त्याने या मालिकेत एकूण ४२० धावा केल्या. यापैकी आश्चर्यचकीत करणारी बाब अशी की, त्याने १७६ धावा या स्वीप शॉट मारुन वसूल केल्या आहेत. यासह त्याने जो रूटचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. याआधी हा रेकॉर्ड जो रूटच्या नावे होता. रूटने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत १६८ धावा स्वीप शॉट मारुन वसूल केल्या होत्या. मुख्य बाब म्हणजे, त्याने या संपूर्ण मालिकेत १२१ स्वीप शॉट मारले. हे कुठल्याही फलंदाजाने एका मालिकेत मारलेले सर्वाधिक स्वीप शॉट आहेत. याआधी जो रूटने श्रीलंकेविरुद्ध खेळताना एकाच मालिकेत सर्वाधिक ११३ स्वीप शॉट मारले होते.

भारतीय संघाचा मालिका विजय

या सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ९ गडी बाद ५०३ धावा करुन डाव घोषित केला. त्यानंतर यादरम्यान देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेलने शतक झळकावलं. त्यानंतर श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी आला. या डावात श्रीलंकेचा डाव अवघ्या २९० धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय संघाने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने ४२९ धावांचा डोंगर उभारला आणि २०० हून अधिक धावांची आघाडी घेतली. शेवटी सामना ड्रॉ झाला.