IND vs SL Test Match Sonal Dinusha Record Update: श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चारही डावांत ५० हून अधिक धावा करत इतिहास घडवला आणि यादरम्यान अनेक विक्रम केले आहे. दरम्यान श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या कसोटीत भारताला कडवी झुंज दिली आहे. दरम्यान लक्षवेधी बाब म्हणजे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिनुशाची तुलना दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्याशी केली. कोलंबो कसोटीदरम्यान शुक्ला यांनी ‘एक्स’वर केलेली एक पोस्ट वादाचा विषय ठरली.

कोलंबो कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात ९ बाद ५०३ धावा केल्या. यानंतर प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाने सोनल दिनुशाचा शतक आणि पासिंदू सूरियाबंदाराच्या ८० धावांच्या खेळीच्या बळावर श्रीलंकेने २९० धावांची खेळी करत सर्वबाद झाला. यानंतर भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. यानंतर भारताने चांगली सुरूवात केली, पण नंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देत ३५० धावांचा पल्ला गाठला आहे.

गुरुवारी झालेल्या गॉल कसोटी सामन्यादरम्यान राजीव शुक्ला यांनी सोनलचं कौतुक केलं. त्यांनी लिहिलं, “श्रीलंकेचा सोनल हा एक अप्रतिम खेळाडू आहे. त्याला खेळताना पाहून मला तेंडुलकरची आठवण आली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट कसोटी खेळाडू बनू शकतो.” सोनलची थेट सचिन तेंडुलकरशी केलेली ही तुलना अनेक चाहत्यांना आवडली नाही आणि त्यानंतर त्यांनी शुक्ला यांना ‘ट्रोल’ केलं.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सोनल दिनुशाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने गॉल कसोटीत शतक झळकावलं आणि त्यानंतर कोलंबो कसोटीतही आणखी एक शतक व दोन अर्धशतकं नोंदवली. या कामगिरीसह, आपल्या पदार्पणाच्या मालिकेत भारताविरुद्ध सलग चार कसोटी डावांत ५० हून अधिक धावा करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. शिवाय, ६७ वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू आहे; यापूर्वी १९५९ मध्ये इंग्लंडच्या केन बॅरिंग्टनने भारताविरुद्ध सलग चार डावांत ५० किंवा त्याहून अधिक धावांची कामगिरी केली होती.

भारताविरुद्ध सलग चार डावांत ५० हून अधिक धावा करणारा सोनल हा केवळ दुसरी श्रीलंकन ​​खेळाडू आहे; याआधी महेला जयवर्धनेने २००१ ते २००५ या कालावधीत खेळल्या गेलेल्या मालिकांमध्ये ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, भारताविरुद्ध सलग सहा वेळा ५० हून अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम तीन फलंदाजांनी केला आहे: वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल, झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर आणि ऑस्ट्रेलियाचा ख्रिस रॉजर्स अशी या खेळाडूंची नावे आहेत.