टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात पराभवाने झाली. अन्नू राणी भालाफेकमध्ये अंतिम फेरी गाठू शकली नाही. यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले. जागतिक विजेता बेल्जियमने त्याला भारताला ५-२ असे पराभूत केले. कुस्तीची सुरुवातही पराभवाने झाली. युवा कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच सामन्यात पराभूत झाली.

ऑलिम्पिकला जाणारी भारतातील सर्वात तरुण महिला कुस्तीपटू सोनम मलिकला विजयासह पदार्पण करण्याची संधी होती. शेवटच्या ३० सेकंदांपर्यंत ती २-० अशी आघाडीवर होती पण मंगोलियन कुस्तीपटू बोलोरतुया खुरेलखूने सामना बरोबरीत आणला. त्यानंतर जास्त गुणांचा डाव खेळल्यामुळे मंगोलियन कुस्तीपटूला विजेता घोषित करण्यात आले. महिलांच्या फ्रीस्टाईल ६२ किलो वजनी गटात हा सामना रंगला.

 

हेही वाचा – Olympics Men’s Hockey: स्वप्नभंग… भारताचा बेल्जियमकडून ५-२ ने पराभव; आता कांस्यपदकासाठी खेळणार

मात्र, सोनम मलिक अजूनही पदकाच्या शर्यतीत आहे. जर मंगोलियाची खुरेलखू अंतिम फेरीत पोहोचली, तर सोनम मलिकला रेपेचेज फेरी खेळण्याची संधी मिळेल, जेणेकरून ती कांस्यपदक जिंकेल.