Sonam Yeshey World Record: क्रिकेट हा जगभरातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. विश्वचषक, विविध लीग आणि द्विपक्षीय मालिकांमधील संघांची कामगिरी यामुळेही नवे खेळाडू तयार होत आहे. यादरम्यान भूतान आणि म्यानमार संघांमधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २२ वर्षीय खेळाडूने विश्वविक्रम केला आहे.

भूतान आणि म्यानमार यांच्यात टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला. या सामन्यात भूतानने ८२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भूतानने प्रथम फलंदाजी करताना १२७ धावा केल्या. यानंतर म्यानमारचा संपूर्ण संघ ४५ धावांत सर्वबाद झाला. यामागे खरं श्रेय संघाची गोलंदाज सोनम येशे याचं आहे. ज्याने ८ विकेट्स घेत संघाचा धुव्वा उडवला.

२२ वर्षीय सोनम येशेने म्यानमारविरुद्धच्या टी२० सामन्यात चार षटकांत ७ धावा देत ८ विकेट्स घेतल्या. या भेदक गोलंदाजीदरम्यान त्याने फक्त ७ धावा दिल्या. त्याच्या गोलंदाजीविरूद्ध म्यानमारचे फलंदाज टिकू शकले नाहीत. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

सोनम येशेच्या आधी, पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त दोन गोलंदाजांनी सात विकेट्स घेतल्या होत्या. मलेशियाच्या स्याजरुल इद्रुसने २०२३ मध्ये चीनविरुद्धच्या टी-२० सामन्यात सात विकेट्स घेतल्या होत्या. तर बहरीनच्या अली दाऊदने भूतानविरुद्धच्या टी-२० मध्ये सात विकेट्स घेतल्या. आता, सोनमने उल्लेखनीय कामगिरी करून या दोन्ही गोलंदाजांना मागे टाकलं आहे.

भूतानकडून या सामन्यात सोनमशिवाय नामगे चेजेने चांगली कामगिरी केली. त्याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. नंतर नामगे थिनलेने २२ चेंडूत २७ धावांचे योगदान दिलं. ताशी दोर्जीने १७ धावा केल्या आणि भूतानला २० षटकांत १२७ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली.

म्यानमारचे सर्व फलंदाज फेल ठरले आणि परिणामी संघ ४५ धावांवर सर्वबाद झाला. म्यानमारकडून त्टेट लिन ओने १२ आणि प्या फ्यो वाईने १० धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सोनम येशेच्या गोलंदाजीसमोर म्यानमारच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.