Sophie Devine, Suzie Bates and Lea Tahuhu Retires: महिला टी-२० विश्वचषकाच्या गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यानंतर न्यूझीलंड संघाच्या तीन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या तिघींना सामन्यानंतर खास गार्ड ऑफ ऑनर देत संपूर्ण भरलेल्या स्टेडियमसमोर अलविदा करण्यात आलं. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडकडून नऊ गडी राखून झालेल्या दारुण पराभवासह न्यूझीलंडच्या विश्वचषकातील प्रवासाचा शेवट झाला. यासह न्यूझीलंडमधील एका सुवर्णकाळाचा शेवट झाला.
लंडनच्या ‘द ओव्हल’ मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यातील पराभव केवळ किवी संघासाठी निराशाजनकच ठरला नाही, तर न्यूझीलंड क्रिकेटमधील एका ऐतिहासिक आणि सुवर्णयुगाचाही अखेर झाला. या सामन्यानंतर संघातील सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स आणि ली ताहूहू या तीन दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांना अपेक्षित असलेला निरोप मिळाला नसली, तरीही या तिघींची कारकीर्द अद्वितीय आणि ऐतिहासिक ठरली.
सोफी डिव्हाइन, सुझी बेट्स आणि ली तहुहू यांनी या स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटला अत्युच्च शिखरावर नेणाऱ्या या तिन्ही खेळाडूंची आकडेवारीच त्यांच्या महानतेची साक्ष देते. सुझी बेट्स न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान आणि सर्वाधिक सामने खेळलेली खेळाडू म्हणून निवृत्त होत आहे. आपल्या ३७० सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिने विक्रमी १०,७२१ धावा केल्या आणि सर्वाधिक धावांच्या बाबतीत ती पहिल्या स्थानी आहे.
आपल्या २० वर्षांच्या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, अष्टपैलू सोफी डिव्हाइनने न्यूझीलंडसाठी एकूण ३१७ सामने खेळले. यादरम्यान तिने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४,२७९ आणि टी-२० सामन्यांमध्ये ३,८१७ धावा केल्या, ज्यामध्ये अनेकदा सामना जिंकून देणाऱ्या खेळींचा समावेश होता, तसेच २४१ बळी घेत सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं. त्याचबरोबर, किवी संघाची प्रमुख वेगवान गोलंदाज असलेल्या ली ताहूहूने आपल्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत संघाचे २०७ सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आणि २२५ बळी घेतले.
इंग्लंड-न्यूझीलंड खेळाडू-सपोर्ट स्टाफने गार्ड ऑफ ऑनर देत तिघींना दिला निरोप
या तिन्ही दिग्गजांच्या निवृत्तीचा हा ऐतिहासिक आणि भावूक क्षण अधिकच खास करण्यासाठी, न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांचे खेळाडू व सपोर्ट स्टाफ एकत्रितपणे मैदानावर आले. एका रांगेत उभे राहून, या तीन महान क्रिकेटपटूंना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन त्यांना निरोप दिला. याचबरोबर स्टेडियममधील संपूर्ण चाहतावर्ग उभा राहून या तिघींना शुभेच्छा देताना दिसला.
इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंड संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १६३ धावा केल्या. कर्णधार अमेलिया केर ही संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली; तिने ३४ चेंडूंत ४२ धावांची खेळी केली. दरम्यान, माजी कर्णधार सोफी डिव्हाईन तिच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात उत्कृष्ट लयीत दिसली; तिने केवळ १४ चेंडूंत ३० धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. अनुभवी सुझी बेट्सनेही चांगली फलंदाजी करत १३ चेंडूंत १९ धावा केल्या आणि डावाच्या अखेरच्या चेंडूवर ती धावबाद झाली. मात्र, या सामन्यात ली ताहूहू एकही बळी मिळवू शकली नाही.
