पुणेकर सौम्या स्वामिनाथन या पुण्याच्या खेळाडूने अग्रमानांकित तान झोंगेई हिच्यावर मात करीत आशियाई बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत सनसनाटी विजय मिळविला. काळय़ा मोहरांनी हा डाव जिंकून सौम्या हिने आपली गुणसंख्या अडीच केली आहे.
पुरुष गटात सूर्यशेखर गांगुली व व्ही. विष्णू प्रसन्ना यांनी तिसऱ्या फेरीअखेर संयुक्त आघाडी मिळविली आहे. त्यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. गांगुली याने उजबेकिस्तानच्या जहोनगीरोव वाखिदोव याच्यावर शानदार विजय मिळविला. विष्णू प्रसन्ना याने भारताच्याच एम. आर. ललित बाबू याचा पराभव केला. भारताच्या अभिजित गुप्ता, संदीपन चंदा व विदित गुजराथी यांच्यासह सात खेळाडूंनी प्रत्येकी अडीच गुण मिळविले आहेत.
महिलांमध्ये भारताच्या एस. विजयालक्ष्मी व मेरी अॅन गोम्स यांनी प्रत्येकी अडीच गुण मिळविले आहेत. त्यांनी अनुक्रमे दिनारा सादुकासोवा (कझाकिस्तान) व झांग झिओवेन (चीन) यांच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला. भारताच्या पद्मिनी राऊत हिला इराणच्या आतुसा पोर्खशियान हिने पराभवाचा धक्का दिला. पोर्खशियान व अलिया मेदिना यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत.

IND vs SA: विश्वचषकातील खराब कामगिरीचा टेम्बा बावुमाला फटका, भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आफ्रिकन संघ जाहीर