पीटीआय, नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा धावपटू अविनाश साबळेने कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे सुरू असलेल्या साऊंड रनिंग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत ३० वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. ३००० मीटर स्टीपलचेसमधील राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या साबळेने या शर्यतीत १३ मिनिटे आणि २५.६५ सेकंद वेळेची नोंद केली. परंतु त्याला १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले. साबळे अमेरिकेच्या यूजीनमध्ये १५ ते २४ जुलै दरम्यान होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील साबळेने बहादूर प्रसाद यांचा १३ मिनिटे, २९.७० सेकंदांचा विक्रम मोडला. हा विक्रम त्यांनी १९९२ मध्ये बर्मिगहॅम येथे नोंदवला होता. त्याने भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील दुसरा सर्वात जुना राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. सर्वात जुना राष्ट्रीय विक्रम मॅरेथॉनमध्ये (२ तास, १२ मिनिटे) शिवनाथ सिंह यांच्या नावे आहे. जो त्यांनी ४४ वर्षांपूर्वी १९७८ साली रचला होता.

अर्धमॅरेथॉनमधीलही राष्ट्रीय विक्रम साबळेच्या खात्यावर आहे. त्याने २०२०मध्ये दिल्ली अर्धमॅरेथॉन शर्यतीमध्ये हा विक्रम केला होता. साबळेने आपला ३००० मीटर स्टीपलचेसचा राष्ट्रीय विक्रम अनेकदा मोडीत काढला आहे. त्याने मार्चमध्ये थिरुवनंतपुरम येथे झालेल्या इंडियन ग्रां.प्री. २ मध्ये ८:१६.२१ सेकंद अशी वेळ नोंदवत सातव्यांदा हा विक्रम मोडला. ‘‘आम्ही ३००० मीटर स्टीपलचेस आणि ५००० मीटर अशा दोन्ही स्पर्धेत अविनाशला उतरवण्याचा विचार करत आहोत,’’ असे भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले.