Suryakumar Yadav Wicket: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्याच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. पावरप्लेमध्ये मुंबईच्या फलंदाजांना हवी तशी सुरुवात करता आली नाही. दरम्यान सौरभ दुबेने भन्नाट वेगवान चेंडू टाकून सूर्यकुमार यादवला बाद करत माघारी धाडलं आहे.

तर झाले असे की, पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला सुरुवातीलाच ३ मोठे धक्के बसले होते. त्यामुळे सूर्यकुमार यादवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो असं काहीच करु शकलेला नाही. या हंगामाप्रमाणे, या सामन्यातही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. कोलकाताकडून पावरप्लेमधील शेवटचे षटक टाकण्यासाठी सौरभ दुबे गोलंदाजीला आला. डावखुऱ्या हाताच्या सौरभने राऊंड द विकेटचा मारा करताना ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर सूर्याने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीला जाऊन लागला. त्यामुळे सूर्याला अवघ्या १५ धावांवर माघारी परतावं लागलं आहे.

पावरप्लेमध्ये मुंबईची फ्लॉप सुरुवात

या सामन्यात मुंबईकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण मुंबईला असं काहीच करता आलेलं नाही. सलामीला आलेला रायन रिकल्टन अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्मा १५ धावांवर माघारी परतला. नमन धीर शून्यावर माघारी परतला. सूर्यकुमार यादवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो १५ धावांवर माघारी परतला. मुंबईने पावरप्लेमध्ये अवघ्या ४६ धावा केल्या.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:

मुंबई इंडियन्स- रायन रिकलटन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, रघू शर्मा

कोलकाता नाईट रायडर्स- अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, रोव्हमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नारायण, अनुकुल रॉय, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे