Sourav Ganguly Kolkata House Inside Photos: क्रिकेटपटू सौरव गांगुली त्याच्या मैदानातील आक्रमक खेळासोबतच आलिशान जीवनशैलीसाठी ओळखला जातो. सौरव गांगुली कोलकात्यातील बेहाला येथील ‘बिरेन रॉय रोड’वर असलेल्या त्याच्या तब्बल ४० कोटी रुपयांच्या पिढीजात बंगल्यात राहतो. शहरातील सर्वात मोठ्या आणि भव्य बंगल्यांपैकी एक असलेल्या या घरात ४८ खोल्या, राजेशाही डायनिंग एरिया, वॉर्म लाईट्सने सजलेले लिव्हिंग रूम्स आणि खास क्रिकेट पिच आहे. गांगुलीने आपल्या या स्वप्नवत घरातील आवडता कोपरा आणि स्वर्गीय वडिलांच्या आठवणींनी सजलेली भावनिक ‘ट्रॉफी रूम’ चाहत्यांना दाखवत आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

४० कोटींच्या या बंगल्यात ४८ खोल्या, एक डायनिंग रूम, फॅमिली रूम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी तसेच पाहुण्यासाठी अनेक डायनिंग आणि लिव्हिंग एरिया आहेत. या घरात प्रामुख्याने वेगवेगळे पण फिकट रंग वापरण्यात आले आहेत. क्रीम आणि ऑफ-व्हाइट रंगाच्या भिंतींमुळे घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश खेळता राहतो. “माझ्या आईला पांढरा रंग आवडतो, पण भारतात धुळीमुळे पांढरा रंग तसाच राहणं शक्य नाही,” असं सौरव गांगुलीने ‘एशियन पेंट्सच्या’ ‘व्हिएर द हार्ट इज’ सीरिजमध्ये सांगितलं.

सौरव गांगुलीला आवडत नाहीत भडक रंग

“मला फिकट रंग जास्त आवडतात. मला जास्त भडक लाल किंवा भडक निळा रंग आवडत नाही, कारण भिंतींवरील फिकट रंग घरात शांततेचा संदेश देतात आणि त्यामुळे घरातील वातावरण खूप प्रसन्न आणि शांत राहते,” असं त्याने पुढे सांगितलं. घरात सूर्यप्रकाश यावा यासाठी मोठ्या खिडक्या आहेत.

Sourav Ganguly Kolkata House Inside Photos Behala Bungalow Trophy Room
सौरव गांगुलीच्या घरातील डायनिंग एरिया (फोटो- एशियन पेंट्स युट्यूब)

डायनिंग हॉलमध्ये क्रीम आणि सोनेरी नक्षीकाम असलेला ८ आसनी राजेशाही डायनिंग टेबल आहे. भिंतीवरील जुन्या कपाटात जुना टेलिव्हिजन सेट, फोटो फ्रेम्स आणि इतर सजावटीच्या वस्तू ठेवल्या आहेत. भिंतींवरील कलाकृती आणि वॉर्म लाईट्स या जागेचं सौंदर्य आणखी वाढवतात.

सौरव गांगुलीचा घरातील आवडता कोपरा

सौरव गांगुलीची घरातील सर्वात आवडती जागा म्हणजे शेवाळी हिरव्या रंगाच्या भिंती आणि ऑलिव्ह ग्रीन सोफा असलेली खोली आहे. हा सौरवचा ‘मॉर्निंग कॉर्नर’ आहे. इथे सौरव चहाचा कप आणि बिस्किटांबरोबर वर्तमानपत्र वाचत बसतो. “सर्वात आधी मी वृत्तपत्रातील क्रीडा क्षेत्राच्या बातम्या वाचतो,” असं तो म्हणाला. इतकंच नाही तर क्रीडाच्या बातम्या शेवटच्या पानावर असतात, त्यामुळे तो कायम वृत्तपत्र मागच्या बाजूनेच वाचायला सुरू करतो.

Sourav Ganguly Kolkata House Inside Photos Behala Bungalow Trophy Room
सौरव गांगुलीचे कोलकात्यातील घर (फोटो- सोशल मीडिया)

सौरव गांगुलीच्या घरातील ट्रॉफी रूम

सौरव गांगुलीच्या घरात एक ‘ट्रॉफी रूम’ आहे. ही सौरवसाठी आठवणींनी भरलेली ही एक भावनिक जागा आहे. “या खोलीतील सर्वात खास गोष्ट काय? तर ही खोली माझ्या वडिलांनी बनवली आहे. ते आता हयात नाहीत, पण तुमचे आई-वडील तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या कर्तुत्वाला किती महत्त्व देतात हे यावरून दिसून येतं. त्यांना क्रिकेटचं वेड होतं. येथील प्रत्येक फोटो, प्रत्येक ट्रॉफी त्यांनी स्वतः लावली आहे,” असं त्याने सांगितलं.

Sourav Ganguly Kolkata House Inside Photos Behala Bungalow Trophy Room
सौरव गांगुलीच्या घरातील ट्रॉफी रूम (फोटो- एशियन पेंट्स युट्यूब)

इंग्लंडमधील सलग दोन कसोटी शतकांच्या आठवणी जपणार्‍या २१ वर्षे जुन्या शॅम्पेनच्या बाटल्यांपासून ते ‘कोलकाता नाइट रायडर्स’ टीममध्ये असतानाच्या आयपीएल हेल्मेट्सपर्यंत, ही खोली त्याच्या उज्ज्वल करिअरची आणि यशाची साक्ष देते.

क्रिकेट पिच

उंच झाडे असलेल्या हिरव्यागार अंगणात पळण्यासाठी एक रनिंग ट्रॅक आहे. त्याच्या कडेला पांढऱ्या आणि लाल रंगाच्या टाईल्स लावल्या आहेत. तसेच बाहेर एक छोटे क्रिकेट पिच देखील आहे, इथे सौरव गांगुली अजूनही त्याचा क्रिकेटचा छंद जोपासतो.