Delhi Capitals Head Coach IPL 2027: आयपीएल २०२७ मध्ये अनेक संघांचा चेहरामोहरा बदलेला दिसणार आहे. २०२६च्या हंगामानंतर फ्रँचायझींनी संघात मोठे बदल करण्यास सुरूवात केली आहे. आरसीबी, पंजाब किंग्स असे संघ वगळता इतर सर्व संघांमध्ये बदलांना सुरूवात झाली आहे. अनेक संघांनी आपले हेड कोचदेखील बदलले आहेत. याचदरम्यान आता दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.

भारताच्या सर्वकालीन महान कर्णधारांपैकी एक मानले जाणारे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची आगामी आयपीएल (IPL) हंगामासाठी ‘दिल्ली कॅपिटल्स’चे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी, गेल्या दोन वर्षांपासून हेमंत बदानी ही जबाबदारी सांभाळत होते. गांगुली याआधीही दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होते. त्यांनी पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांसाठी ‘क्रिकेट संचालक’ (Director of Cricket) म्हणून काम पाहिलं आहे. २०१९ मध्ये ते सल्लागार म्हणून दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाले होते.

सौरव गांगुली यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोण कोण?

२००८ पासून आयपीएलमध्ये सहभागी असूनही जे संघ अद्याप विजेतेपद मिळवू शकले नाहीत, अशा दोन फ्रँचायझींपैकी ‘दिल्ली कॅपिटल्स’ हा एक संघ आहे; दुसरा संघ ‘पंजाब किंग्स’ हा आहे. त्यामुळे, फ्रँचायझीला त्यांचं पहिलं आयपीएल विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी गांगुली यांच्यावर असेल. युवराज सिंग हा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून गांगुलीच्या सहाय्यक चमूत सामील होऊ शकतो. याव्यतिरिक्त, श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वास आणि माजी लेग-स्पिनर अमित मिश्रा यांचाही यात समावेश होण्याची शक्यता आहे, मात्र फ्रँचायझीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

२०२४ मध्ये सौरव गांगुली यांची JSWच्या ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’पदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष होण्याआधी त्यांनी IPL २०१९मध्ये एका हंगामासाठी संघाचे मेंटॉर म्हणून जबाबदारीही सांभाळली होती. यानंतर SA20 २०२५मध्ये सौरव गांगुली यांनी प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. महिला प्रीमियर लीगमध्येही ते संघासोबत जोडले गेले होते. दरम्यान, ऋषभ पंतचीही दिल्ली संघात घरवापसी झाली आहे. पंत यापूर्वी दिल्ली संघाचा कर्णधारही राहिला आहे. २०१६ ते २०२४ या कालावधीत तो सलग नऊ हंगामांमध्ये दिल्लीकडून खेळताना दिसला होता.