प्रशासकीय कारभारातील अनियमीतता आणि लोढा समितीच्या शिफारसींचं पालन करण्यासाठी केलेली दिरंगाई यावरुन सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर कारवाई करत, सर्वात श्रीमंत बोर्डावर क्रिकेट प्रशासकीय समितीची स्थापना केली. यानंतर काही वर्षांनी नवीन संविधानानुसार बीसीसीआयच्या निवडणूका पार पडल्या, ज्यात माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे बीसीसीआयचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं. अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर गांगुलीने बीसीसीआयच्या कारभारात काही लक्षणीय बदल केले. सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत, सर्व क्रिकेट बोर्डांना आपलं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या दौऱ्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅम स्मिथ यांनी सौरव गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.

“आयसीसीच्या अध्यक्षपदावर योग्य व्यक्तीने बसणं गरजेचं आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एका खमक्या नेतृत्वाची गरज लागणार आहे. त्यामुळे खेळ माहिती असणारा आणि सध्याच्या जमान्याशी जुळवून घेणारा व्यक्ती आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी योग्य ठरेल. गांगुलीसारखा व्यक्ती त्या पदावर बसला तर ते योग्य ठरेल. क्रिकेटसाठी ते फायदेशीर ठरेल, त्याला खेळाविषयी माहिती आहे. तो प्रचंड अनुभवी आहे आणि त्याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आदर आहे.” स्मिथ AFP शी बोलत होता.

सौरव गांगुलीच्या पुढाकाराने बीसीसीायने दिवस-रात्र कसोटी खेळण्याची तयारी दाखवली. २०१९ साली भारताने बांगलादेशविरुद्ध कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. सध्या बीसीसीआयसमोर आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्याचं मोठं आवाहन असणार आहे. हा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे, त्यामुळे वर्षाअखेरीस हा हंगाम आयोजित करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.