भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ऑस्ट्रेलियाच्या फिरकीजोडीवर कौतुकाचा वर्षाव केला. स्टीव्हन ओ’कफी आणि नॅथन लियॉन या फिरकी जोडीने भारतीय संघाचे कंबरडे मोडले आहे. पुण्यातील कसोटीत स्टीव्हन ओ’कफी याने दोन डावात तब्बल १२ विकेट्स घेतल्या होत्या, तर बंगळुरूतील दुसऱया कसोटीत नॅथन लियॉनने पहिल्या डावात भारताच्या ८ विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला. लियॉनच्या अचूक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली.
ऑस्ट्रेलियाच्या फिरकीजोडीबद्दल बोलताना गांगुली म्हणाला की, मी आजवर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीजोडीला अशाप्रकारची अफलातून कामगिरी करताना याआधी केव्हाच पाहिले नाही. ओ’कफी आणि नॅथन लियॉन यांनी दोघांनी भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले. दोघांकडून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी गांगुलीने भारतीय संघ कांगारुंना व्हाईटवॉश देईल असे भाकीत केले होते. पण पहिल्याच कसोटीत भारतीय संघाला ३३३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी गांगुलीचे भाकीत खोटे ठरवून दाखवले. दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव १८९ धावांत संपुष्टात आणल्यानंतर ८७ धावांची आघाडी घेत सर्वबाद २७६ धावा केल्या. जडेजाने ६३ धावांवर ६ विकेट्स घेतल्या. म्हणून ऑस्ट्रेलियाची आघाडी रोखता आली. दरम्यान, दुसऱया डावात भारतीय संघाने १५० धावांचा टप्पा ओलांडला असला तरी संघाचे चार फलंदाज तंबूत दाखल झाले आहेत. तर भारताकडे जवळपास ६८ धावांची आघाडी आहे. भारतीय संघाच्या आघाडीला भक्कम करण्याची जबाबदारी आता चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर आहे.