पीटीआय, कोलकाता
ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळवणे अवघड जाईल असे दिसत असले, तरी भारतीय संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याला केवळ फलंदाज म्हणून खेळविण्याचा पर्याय भारतासमोर असून तिसऱ्या क्रमांकासाठी तो दावेदार असू शकेल, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.
जुरेलने अलीकडच्या काळात कसोटी संघ आणि भारत ‘अ’ संघाकडून चमकदार कामगिरी केली आहे. जायबंदी पंतच्या जागी संधी मिळाल्यावर जुरेलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक साकारले होते. त्यानंतर त्याने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’ संघाकडून दोन्ही डावांत शतक केले. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पंतचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे जुरेलला संघाबाहेर बसावे लागेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, गांगुली याच्याशी सहमत नाही. जुरेलबाबत निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला नक्कीच विचार करावा लागेल असे गांगुलीला वाटते.
‘‘जुरेलने गेल्या काही सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता पंत संघात परतला आहे. त्यामुळे जुरेलबाबत निवड समिती काय विचार करत आहे, हे मला ठाऊक नाही. दोन्ही सलामीवीर (यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल), चौथ्या क्रमांकावर कर्णधार शुभमन गिल, पाचव्या क्रमांकावर पंत, त्यानंतर रवींद्र जडेजा यांचे संघातील स्थान पक्के आहे. या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करून स्वत:चे महत्त्व सिद्ध केले आहे. त्यामुळे जुरेलसाठी मधल्या फळीत सध्या तरी जागा नाही. संघ व्यवस्थापनासमोर तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय खुला आहे. या क्रमांकावर ते साई सुदर्शनलाच खेळवतात की जुरेलची कामगिरी लक्षात घेऊन त्याला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल,’’ असे गांगुली म्हणाला.
भारताचे पारडे जड
दरम्यान, घरच्या मैदानांवर खेळताना भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे मत गांगुलीने मांडले. ‘‘भारताची फिरकी गोलंदाजांची फळी मजबूत आहे. भारतीय कसोटी संघात युवा खेळाडूंचा भरणा असूण त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच इंग्लंडमध्ये जाऊन अप्रतिम कामगिरी केली. त्यांचा खेळ पाहताना फार मजा आली. गिल, जैस्वाल, राहुल आणि पंत यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि जडेजा यांसारखे गोलंदाज भारताची ताकद वाढवतात. दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच पाकिस्तानात चांगली कामगिरी केली हे मला ठाऊक आहे. मात्र, भारताविरुद्ध भारतात खेळणे हे प्रतिस्पर्धी संघासाठी वेगळेच आव्हान असते. भारताला झुंज देण्यासाठीही दक्षिण आफ्रिकेला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल,’’ असे गांगुलीने नमूद केले.
खेळपट्टीबाबत सूचना नाही
कोलकाता येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार करण्याची भारतीय संघाने सूचना केलेली नाही, असे बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असलेल्या गांगुलीने स्पष्ट केले. ‘‘भारतीय संघाने खेळपट्टीबाबत आम्हाला कोणतीही सूचना केलेली नाही. मी खेळपट्टी पाहिली आहे. ती खूप चांगली वाटते आहे,’’ असे गांगुली म्हणाला. दरम्यान, इडन गार्डन्सचे खेळपट्टी देखरेखकार (क्युरेटर) सुजन मुखर्जी यांनी तिसऱ्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले. या सामन्यात बॅट आणि चेंडूमध्ये चांगली झुंज पाहायला मिळेल असेही मुखर्जी म्हणाले.
शमीला संधी गरजेची
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तंदुरुस्ती सिद्ध केली असून त्याला आता राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळायला हवी असे गांगुलीला वाटते. ३५ वर्षीय शमीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी डावलण्यात आले. तो मार्चपासून भारतासाठी खेळलेला नाही. ‘‘शमी अप्रतिम कामगिरी करत आहे. तो आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. रणजी करंडकात त्याने तीन सामने खेळले आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने बंगालला सामनेही जिंकवले. निवड समिती त्याच्या कामगिरीवर निश्चितपणे लक्ष ठेवून असेल. त्यांनी शमीशी संवादही साधला असेल. माझ्या मते, आता त्याला कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तीनही प्रारूपांत संधी मिळाली पाहिजे,’’ असे गांगुलीने नमूद केले.
