Sourav Ganguly on Team India 2000 Match Fixing: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने २६ वर्षांनी, २००० सालच्या मॅच-फिक्सिंग वादावर मौन सोडलं आहे. मॅच फिक्सिंग घोटाळा हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात काळा आणि लाजिरवाणा अध्याय मानला जातो. क्रिकेट हा देशातील सर्वात लोकप्रिय आणि लोकांच्या भावनांशी जोडलेला खेळ होता. २००० पूर्वी भारतीय संघाची कामगिरी फारशी उल्लेखनीय नसली, तरी चाहत्यांचा क्रिकेटवरील विश्वास कायम होता. पण फिक्सिंग प्रकरणानंतर संघाची प्रतिमा मलीन झाली आणि या काळात संघाला सावरण्याचं काम केलं सौरव गांगुलीने. सौरव गांगुलीने आता २६ वर्षांनंतर या प्रकरणावर बोलताना त्याने सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे व राहुल द्रविड यांना या प्रकरणाबाबत प्रश्न विचारल्याचा खुलासा केला.
२००० पूर्वी भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय नसली तरी चाहत्यांचा संघाला पूर्ण पाठिंबा असे. मात्र, पैशांसाठी सामने फिक्स केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर हा विश्वास मोठ्या प्रमाणात डळमळला. हॅन्सी क्रोनिए हा या प्रकरणातील मुख्य खलनायक ठरला, पण मोहम्मद अझहरुद्दीन आणि अजय जाडेजा यांच्या नावांमुळे भारतीय क्रिकेटची प्रतिमाही मलीन झाली. भारतीय क्रिकेट नव्या सहस्रकात प्रवेश करत असताना एका मोठ्या वळणावर उभं होतं. मोहम्मद अझहरुद्दीनवर आजीवन बंदी घालण्यात आली होती, तर अजय जाडेजाला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशा परिस्थितीत सौरव गांगुलीने संघाची सूत्र हाती घेतलं.
गांगुलीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आणि भारतीय क्रिकेटला पुन्हा उभं करण्याचा निर्धार केला. मात्र, संघाला त्या धक्क्यातून बाहेर काढणं सोपं नव्हतं, हे गांगुलीनेही मान्य केलं आहे. खेळाडूंवरील विश्वास तुटला होता आणि प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहिलं जात होतं. अशा कठीण काळात गांगुलीने संघाची नव्याने बांधणी केली अक्षरशः एक-एक वीट रचत भारतीय क्रिकेटला पुन्हा मजबूत उभं केलं.
मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर सौरव गांगुलीने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर काय घडलं होतं?
त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने हळूहळू त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने हळूहळू स्वतःची ओळख आणि चाहत्यांचा विश्वास पुन्हा मिळवायला सुरुवात केली. राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये गांगुलीने या प्रकरणावर मोकळेपणाने भाष्य केलं, “मी कर्णधार होण्याच्या आधी भारतीय संघ ज्या गोष्टींमधून जात होता, बेटिंग, मॅच फिक्सिंग त्या सगळ्याबद्दल मला खरंच काहीच माहिती नव्हती. मी सतत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडला विचारायचो, ‘हे खरंच घडतं का? तुम्हाला कोणी संपर्क केला होता का?’ कारण मला कधीच कोणी संपर्क केला नव्हता.
मी सचिनला विचारलं होतं, ‘तुला कोणी विचारलं होतं का?’ त्यानेही ‘नाही’ असंच सांगितलं. आम्ही सगळेच कसोटी आणि वनडे दोन्ही प्रकार खेळत होतो. मी अनिल कुंबळेलाही विचारलं. त्यानेही सांगितलं, ‘नाही, मला कोणी काही विचारलं नाही.’ त्यामुळे हे सगळं नेमकं काय आहे, याची मला स्पष्ट कल्पनाच नव्हती. माझ्यासमोर त्या वेळी फक्त कर्णधारपदाची जबाबदारी होती. त्यामुळे बाकी गोष्टी डोक्यातच नव्हत्या,” असं सौरव गांगुलीने सांगितलं.
गांगुली पुढे म्हणाला, “आजही मला आमचा पहिला सामना कोचीमध्ये झाल्याचं आठवतं. सामन्याच्या आदल्या दिवशी मला संघाच्या मिटिंगमध्ये बोलायचं होतं. मी डोनाला सांगितलं होतं की, या संघातील अनेक खेळाडू अझहर, सचिन हे माझे कर्णधार राहिले आहेत. आता मी त्यांना काय करायचं आणि काय नाही हे कसं सांगणार?
मला अजूनही आठवतं, मी तिला सांगितलं होतं की मी मिटिंग खूप छोटी ठेवणार आहे. कारण मिटिंग जितकी लांबेल तितकं मला जास्त बोलावं लागेल. त्यामुळे आम्ही जवळपास १५ मिनिटांत मिटिंग संपवली आणि काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. दुसऱ्या दिवशी आम्ही सामना जिंकलो. त्यानंतर जमशेदपूरमध्ये झालेल्या पुढच्या सामन्यात मी शतक झळकावलं. आणि हळूहळू सगळ्या गोष्टी योग्य मार्गावर येऊ लागल्या,” असं गांगुलीने या प्रकरणाबाबत माहिती दिली.
