भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीने या महिन्याच्या सुरुवातीलाच माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली. द्रविडच्या नियुक्तीची घोषणा होण्याआधीच अनेक वृत्तपत्रांनी प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींनंतर बीसीसीआयची पहिली पसंती द्रविडलाच असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसारच सारं काही घडलं. बीसीसीआयने द्रविडच्या माध्यमातून रितसर अर्ज करुन घेत त्याची प्रशिक्षकपदी नेमणूक केली. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये असणारा द्रविड आता पुढील दोन वर्षांसाठी भारतीय संघाला प्रशिक्षक असेल. रवि शास्त्रींप्रमाणे कामगिरीच्या आधारावर द्रविडलाही नंतर कॉन्ट्रॅक्ट वाढवून दोन वर्षांहून अधिक कालावधी दिला जाऊ शकतो.

राहुल द्रविडला या पदावर नियुक्त करण्यासंदर्भात नुकताच दुबईमध्ये पार पडलेल्या शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक समारंभामध्ये बीसीसीआय अध्यक्ष असणाऱ्या गांगुलीने एक मजेदार वक्तव्य केलं आहे. “मला राहुल द्रविडच्या मुलाचा फोन आला होता. त्याने मला सांगितलं की त्याचे वडील म्हणजेच राहुल द्रविडने त्यांना फार कठोर नियम घालून दिले असून अगदी कठोरपणे तो त्यांच्याशी वागतो. त्यामुळेच आपल्या वडिलांना घरापासून दूर ठेवण्याची गरज आहे. त्यानंतरच मी राहुल द्रविडला मी फोन केला आणि सांगितलं की आता राष्ट्रीय संघासोबत काम करण्याची तुझी वेळ आली आहे,” असं गांगुलीने द्रविडच्या नियुक्तीचा किस्सा सांगताना मस्करीमध्ये म्हटलं.

द्रविडसोबत प्रशिक्षकपदासंदर्भात चर्चा करणं मला फार कठीण गेलं नाही असं गांगुलीने स्पष्ट केलं. आमची मैत्री मागील अनेक वर्षांपासून असल्याने मला द्रविडशी थेट संवाद साधताना काही विचित्र वाटलं नाही, असं गांगुली म्हणाला. “आम्ही एकत्रच मोठे झालो आहोत. आम्ही जवळजवळ एकाच कालावधीमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि अनेकदा आम्ही एकत्र खेळलोय. त्यामुळेच द्रविडचं या पदावर स्वागत करणं आम्हाला फारच सहज शक्य झालं,” असं गांगुली म्हणाला.

द्रविड मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडविरुद्धची आगामी मालिका ही भारताची पहिली मालिका असेल. विश्वचषक स्पर्धा संपली असून आता उपविजेता ठरलेला न्यूझीलंडचा संघ भारत दौर्‍यावर येणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर तीन टी -२० आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.