सगळे हंगाम खेळूनही जेतेपदापासून दूर राहिलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने नव्याने संघबांधणी करायचं ठरवलं आहे. जेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने भारताचा माजी माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांना कोचिंग स्टाफमध्ये घेण्याची तयारी दिल्ली संघाने केली आहे. दिल्ली कॅपिटल्सतर्फे काही खेळाडूंसाठी ट्रायल्स आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी गांगुली आणि युवराज उपस्थित होते. दिल्ली कॅपिटल्स संघाने यासंदर्भात औपचारिक घोषणा केलेली नाही.

सौरव गांगुली याआधीही दिल्ली कॅपिटल्स संघाशी संलग्न होते. युवराज सिंगचं अनेक युवा खेळाडूंच्या जडणघडणीतलं महत्त्व स्पष्ट झालं आहे. युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्स संघाचा बॅटिंग कोच होणार असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं होतं. पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत तसंच २०११ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत युवराज भारताच्या विजयाचा शिल्पकार होता. दिल्ली कॅपिटल्स संघ फलंदाजीत ढेपाळतो. हा कच्चा दुवा दूर करण्यासाठी युवराजसारखा अनुभवी मार्गदर्शक योग्य ठरू शकतो.

गांगुलीने दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं होतं. गांगुली आता दिल्ली कॅपिटल्स संघाचे डिरेक्टर ऑफ क्रिकेट असतील असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं होतं. जेएमआर आणि जेएसडब्ल्यू यांच्यातील करारानुसार, पुढील दोन वर्षांसाठी संघाचं व्यवस्थापन जेएसडब्ल्यू कंपनीकडे असणार आहे. जेएमआर कंपनीकडे संघाची सूत्रं असताना वेणूगोपाळ राव, हेमांग बदानी आणि मुनाफ पटेल दिल्लीच्या कोचिंग टीमचा भाग होते. मात्र आता त्यांच्या जागी गांगुली-युवराज असतील.

बंगळुरू इथे झालेल्या ट्रायलवेळी गांगुलीच्या बरोबरीने भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्राही उपस्थित होता. युवराज सिंगला कोचिंग ताफ्यात सामील करून घेण्यासाठी गांगुली उत्सुक असल्याचं समजतं. युवराजने गांगुलीच्या नेतृत्वात भारतासाठी पदार्पण केलं. गांगुलीच्या नेतृत्वातच युवराजची कारकीर्द बहरली. युवराज दिल्लीच्या पुरुष संघाबरोबर काम करेल तर गांगुली पुरुष तसंच महिला संघ आणि प्रिटोरिया कॅपिटल्स अशा तिहेरी भूमिकेत असेल.

गेल्या दोन हंगामात दिल्ली संघाला प्लेऑफ्सचा टप्पा गाठता आलेला नाही. लिलावात खेळाडूंची निवड हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या ट्रेडऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने ऋषभ पंतला ताफ्यात सामील करून घेतलं आहे. ऋषभकडे दिल्लीची सूत्रं असणार का अक्षर पटेलच कर्णधारपदी राहणार हे पाहणंही उत्सुकतेचं असेल.