South Africa vs Canada: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत नवखे संघ अनुभवी संघांविरूद्ध खेळताना दमदार कामगिरी करताना दिसून येत आहेत. स्पर्धेतील ९ वा सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कॅनडाने दक्षिण आफ्रिकेला कडवी झुंज दिली. पहिल्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २१३ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कॅनडाला सुरूवातीला मोठे धक्के बसले. पण शेवटी नवनीत धलीवालने अर्धशतकी खेळी करून संघाला आव्हानाच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण कॅनडाला हा सामना ५७ धावांनी गमवावा लागला आहे.

हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या मैदानावर धावांचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. त्यामुळे कॅनडाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कॅनडाला हा सामना जिंकण्यासाठी २१४ धावांचा डोंगर सर करायचा होता. कॅनडाकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला कर्णधार दिलप्रीत बाजवा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर युवराज सामराने १२ धावा केल्या. तर निकोलस किरटोन अवघ्या ४ आणि श्रेयस मोवा अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. शेवटी हर्ष ठकेरने ३३ आणि साद जफरने ११ धावांचे योगदान दिले. कॅनडाकडून नवनीत धालीवालने ६४ धावांची दमदार खेळी केली. पण तो कॅनडाला पहिला विजय मिळवून देऊ शकलेला नाही.

या सामन्यात कॅनडाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांअखेर ४ गडी बाद २१३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या कर्णधार एडेन मारक्रम आणि क्विंटन डी कॉक यांनी दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. एडेन मारक्रमने ५९ धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने २५ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रायन रिकल्टनने ३३ धावा केल्या. शेवटी डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्सने तुफान फटकेबाजी केली. डेव्हिड मिलरने २३ चेंडूत ३९ धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सने १९ चेंडूत ३४ धावा केल्या. या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने २० षटकांअखेर ४ गडी बाद २१३ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी

हा दोन्ही संघांचा या स्पर्धेतील पहिलाच सामना होता. दक्षिण आफ्रिकेने २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याामुळे यावेळीही दक्षिण आफ्रिकेला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली आहे.दक्षिण आफ्रिकेचे पुढील सामने न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि यूएई या संघांविरूद्ध होणार आहेत.