केपटाउन : तझमिन ब्रिट्स (५५ चेंडूंत ६८ धावा) आणि लॉरा वोल्व्हार्ड (४४ चेंडूंत ५३) या सलामीवीरांची अप्रतिम फलंदाजी, तसेच अयाबोंगा खाका (४/२९) आणि शबनिम इस्माइल (३/२७) या वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी इंग्लंडला सहा धावांनी पराभवाचा धक्का देत महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठली.
उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ४ बाद १६४ अशी धावसंख्या केली. प्रत्युत्तरात इंग्लंडला १८ चेंडूंत २८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी अयाबोंगा खाकाने तीन धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद करत सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने वळवला. इंग्लंडचा डाव २० षटकांत ८ बाद १५८ धावांवर मर्यादित राहिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेसाठी ब्रिट्स आणि वोल्व्हार्ड यांनी ९६ धावांची सलामी दिली. ब्रिट्सने ६८ धावांच्या खेळीत ६ चौकार व २ षटकार, तर वोल्व्हार्डने ५३ धावांच्या खेळीत ५ चौकार व १ षटकार मारला. ब्रिट्सला लॉरेन बेलने बाद केले. तर डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनने वोल्व्हार्डसह आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. मात्र, मॅरीझान कॅपने (१३ चेंडूंत नाबाद २७) फटकेबाजी केल्याने आफ्रिकेला १६० धावांचा टप्पा ओलांडता आला.
प्रत्युत्तरात डॅनी वॅट (३० चेंडूंत ३४) आणि सोफी डंकली (१६ चेंडूंत २८) यांनी इंग्लंडसाठी ५३ धावांची सलामी दिली. मात्र, या दोघी बाद झाल्यानंतर नॅट स्किव्हर-ब्रंट (३४ चेंडूंत ४०) आणि कर्णधार हेदर नाईट (२५ चेंडूंत ३१)
वगळता इंग्लंडच्या इतर फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.