टी२० वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने अपराजित राहत सेमी फायनलचा टप्पा गाठला. रविवारी दिल्लीतल्या अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या लढतीत आफ्रिकेने झिम्बाब्वेवर पाच विकेट्सनी विजय मिळवला. आफ्रिकेने यालढतीआधीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता तर झिम्बाब्वेचं स्पर्धेतलं आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. त्यामुळे ही लढत सराव स्वरुपाची ठरली.
झिम्बाब्वेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध नाबाद ९७ धावांची खेळी करणारा ब्रायन बेनेट या लढतीत विशेष चमक दाखवू शकला नाही. अँनरिक नॉर्कियाने त्याला बाद केलं. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने ४३ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. क्वाईव्ह मॅडंडेने २० चेंडूत २६ धावा करत त्याला साथ दिली. मात्र बाकीचे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. झिम्बाब्वेने १५३ धावांची मजल मारली. आफ्रिकेतर्फे क्वेना मफाका आणि कार्बिन बॉश यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना सिकंदर रझाने एडन मारक्रम आणि क्विंटन डी कॉक या बिनीच्या शिलेदारांना तंबूत परतावलं. यानंतर रायल रिकलटन आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी पडझड थांबवली. उसळता चेंडू डोक्यावर बसल्याने रिकलटनला कॉँकशन टेस्टला सामोरं जावं लागलं. त्याने फलंदाजी सुरू ठेवली. इव्हान्सचा उसळता चेंडू मारण्याचा रिकलटनचा प्रयत्न बर्लच्या सुरेख झेलमुळे संपुष्टात आला. त्याने ३१ धावा केल्या. यानंतर ब्रेव्हिसच्या साथीला अनुभवी मिलर आला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. मुझाराबानीचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ढकलायचा प्रयत्न मेयर्सच्या हातात गेला. मिलरने २२ धावा केल्या. सिकंदर रझाने ब्रेव्हिसला बाद करत विजयाची अंधुक आशा निर्माण केली. ब्रेव्हिसने १८ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. मात्र यानंतर ट्रिस्टन स्टब्ज आणि जॉर्ज लिंड यांनी पाचव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. ७३ धावा आणि ३ विकेट्स पटकावणाऱ्या सिकंदर रझाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
झिम्बाब्वेला दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारताविरुद्ध पराभवाला सामोर जावं लागल्याने त्यांचा वर्ल्डकप प्रवास इथेच संपला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा सेमी फायनपर्यंतचा स्वप्नवत असाच आहे. आफ्रिकेने कॅनडा, अफगाणिस्तान (सुपर ओव्हर), न्यूझीलंड, युएई, भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे अशा सगळ्यांना नमवत सेमी फायनलमध्ये आगेकूच केली आहे. ४ मार्चला बुधवारी कोलकाताच्या इडन गार्डन्स इथे सेमी फायनल १च्या मुकाबल्यात त्यांच्यासमोर न्यूझीलंडचं आव्हान आहे.
