दक्षिण आफ्रिकेने सर्वांगीण खेळ कायम राखत टी२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजवर ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनल फेरीतलं स्थान जवळपास पक्कं केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने यजमान भारत आणि वेस्ट इंडिजला नमवत सेमी फायनलमध्ये जवळजवळ प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजने दिलेलं १७७ धावांचं आव्हान आफ्रिकेने २३ चेंडू आणि ९ विकेट्स राखून पार केलं. दक्षिण आफ्रिकेचे दोन सामन्यात ४ गुण झाले असून त्यांचा नेट रनरेटही उत्तम आहे.
आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र त्यांच्या गोलंदाजांनी अत्यंत शिस्तबद्ध मारा करत वेस्ट इंडिजच्या ताकदवान फटकेबाजांना रोखलं. कर्णधार शे होपने चांगली सुरुवात केली होती. मात्र कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना सापळ्यात रचलं. शिमोरन हेटमायरला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळालं मात्र तो त्याच षटकात तंबूत परतला. ८३/७ स्थितीतून जेसन होल्डर आणि रोमारिओ शेफर्ड यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे वेस्ट इंडिजला १७६ धावांची मजल मारता आली. आफ्रिकेतर्फे लुंगी एन्गिडीने ३ तर कागिसो रबाडा आणि कार्बिन बॉश यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना एडन मारक्रमने आक्रमक पवित्रा स्वीकारला. क्विंटन डी कॉकने कर्णधाराचा कित्ता गिरवत मनमुराद फटकेबाजी सुरू केली. या दोघांनी ९५ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. क्विंटन बाद झाल्यानंतर रायल रिकलटनने कर्णधाराला साथ देली. मारक्रमने ४६ चेंडूत ८२ धावांची खेळी करत सूत्रधाराची भूमिका निभावली. रिकलटनने २८ चेंडूत ४५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्यांवर अपयश आलं. एडन मारक्रमलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या सेमी फायनल प्रवेशासह टीम इंडियासाठी समीकरण स्पष्ट झालं आहे. भारतीय संघाला वेस्ट इंडिज आणि झिमाब्ब्वे यांना नमवणं क्रमप्राप्त आहे. भारताने दोन्ही लढतीत विजय मिळवल्यास गणितीय समीकरणांविना त्यांचा सेमी फायनल प्रवेश पक्का होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातला मुकाबला काही वेळात चेन्नई इथे सुरू होत आहे.

